Thu, Jul 18, 2019 02:55होमपेज › Belgaon › विवाहितेच्या खूनप्रकरणी पती, सासूला जन्मठेप

विवाहितेच्या खूनप्रकरणी पती, सासूला जन्मठेप

Published On: Aug 31 2018 1:38AM | Last Updated: Aug 30 2018 10:47PMबंबरगे येथील घटना
बेळगाव : प्रतिनिधी

हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करून गळा आवळून खून केल्याप्रकरणी  बंबरगा (ता. बेळगाव)  येथील पती आणि सासूला जन्मठेप व  प्रत्येकी 55 हजारांचा दंड 6 व्या अप्पर  जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे  न्यायाधीश एम. जी. शिवळ्ळी यांनी सुनावला.

बंबरगा येथील विवाहिता कविता भावकान्‍ना म्यागेरी हिचा हुंड्यासाठी छळ करून गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना 2016 मध्ये घडली होती. याप्रकरणी पती भावकू ओमान्‍ना म्यागेरी व सासू जनाबाई ओमान्‍ना म्यागेरी अशी शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. कविता (मूळ बाळेकुंद्री बी.के.)हिचा विवाह भावकूशी 2015 मध्ये विवाह झाला होता; पण पतीच्या कुटुंबीयांकडून दोनच महिन्यांत त्रास देण्यास सुरुवात झाली. 

स्वयंपाक करता येत नाही, दुसरीकडून अधिक हुंडा मिळाला असता, असे टोमणे मारून तिचा मानसिक छळ करण्यात येत होता. तर, पतीने ढाबा घालण्यासाठी माहेरकडून 5 लाख रुपये आणण्याची मागणी केली होती. यातच ती 4 ते 5 महिन्यांची गर्भवती होती. हे माहीत असतानाही 9 एप्रिल 2016 रोजी दु. 12.30 च्या सुमारास पती व सासूकडून कविताचा गळा आवळून खून करण्यात आला होता. मात्र, हे प्रकरण झाकण्यासाठी तिने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. 

कविताची आई अव्वक्‍का रामा तळवार (वय 55, रा. बाळेकुंद्री) हिने काकती पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती. न्यायालयात सरकारी वकील अ‍ॅड. एस. एस. लोकूर यांनी 22 साक्षीदार व 7 मुद्देमाल सादर केले.