बेळगाव : प्रतिनिधी
आठवड्यावर येऊन ठेपलेल्या रमजान ईदच्या खरेदीसाठी बेळगावची बाजारपेठ गर्दीने फुुलून गेली आहे. विशेषत: सायंकाळी अधिक गर्दी दिसून येत आहे.
रमजान ईद 16 जून रोजी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांकडून कपडे, सुका मेवा, सौंदर्य प्रसाधने आदींच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. विशेषत: सायंकाळी उपवास सोडल्यानंतर महिलांची बाजारात गर्दी होत आहे. यामुळे शहरातील खडेबाजार, गणपत गल्ली, भेंडी बाजार, दरबार गल्ली, खंजर गल्ली, कोतवाल गल्ली, बागवान गल्ली, किर्लोस्कर रोड आदी बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे. बाजारपेठेत विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. स्वागताचे होर्डींग्ज उभाण्यात आले आहेत.
टीव्ही मालिकांमधील साड्या, नव्या चित्रपटातील ड्रेसना मागणी आहे. बाजीराव मस्तानीचा ड्रेसला आजही मुलींकडून मागणी होत आहे. यावर्षी मुलांसाठी पठाणी ड्रेसना चांगली मागणी आहे. त्याचबरोबर मुलींमध्ये प्लाझो, गरारा, अनारकली, कराची, पटीयाला आदींना अधिक मागणी असल्याचे विक्रेते मौलाना मुझम्मील यांनी सांगितले. मुलींच्या ड्रेसची किंमत अगदी पाचशेपासून पाच हजार रुपयापर्यंत आहे. पठाणी ड्रेसची किंमत जवळपास चारशे पासून दोन हजाराच्या घरात आहेत. तरुणाईकडून शेरवानी, जिन्स पँटना मागणी असल्याचे महंमद इब्राहिम यांनी सांगितले. बुरख्यांच्या किमतीही यंदा वाढल्या आहेत. अमरेला बुरख्यास अधिक मागणी आहे. बुरख्यांच्या किमती तेराशे ते साडे तीन हजाराच्या घरात आहेत.
जीएसटीचा चांगलाच फटका बाजार पेठेला बसला असून यामुळे अनेक व्यापार्यांनी नाराजी व्यक्त केली. जीएसटीमुळे कपड्यांच्या किमती जवळस दहा टक्क्यांनी वाढल्या आहेत. जीएसटीमुळे व्यापारामध्ये घट झाली असून अधिकार्यांकडून होणार्या तपासणीमुळेही व्यापारी त्रस्त झाले आहेत. त्याचबरोबर नमाजी टोप्या, सौंदर्य प्रसाधने आदींचीही खरेदी होत आहे. सायंकाळी उपवास सोडण्यासाठी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल बाजारात सजले आहेत. याठिकाणी सायंकाळी गर्दी होत आहे.