Mon, Jun 17, 2019 18:37होमपेज › Belgaon › मार्कंडेय स्वच्छतेसाठीचे कोट्यवधी पाण्यात

मार्कंडेय स्वच्छतेसाठीचे कोट्यवधी पाण्यात

Published On: Mar 05 2018 9:22PM | Last Updated: Mar 05 2018 9:12PMआंबेवाडी : वार्ताहर

उन्हाळ्यात तसेच इतर वेळी नदीमध्ये पाण्याचा योग्य निचरा व्हावा, नदीची पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढावी यासाठी गतवर्षी रोजगार हमी योजनेतून आंबेवाडी-मण्णूर भागात  नदीचे पुनरुज्जीवन करण्यात आले. परंतु याचा प्रभाव काही दिवस पाहायला मिळाला. सध्या नदीची स्थिती पाहता ती पूर्वीसारखीच झाली आहे. 

बंधारा असूनही पाण्याचा थेंब नदीपात्रात दिसत नाही. रोजगार हमी योजनेतून गतवर्षी कोट्यवधी रुपये खर्चून नदीपात्राची स्वच्छता तसेच रुंदीकरण, गाळ उपसा आदी कामे हाती घेण्यात आली होती. काही ठिकाणचा गाळ उपसा झाला. मात्र महत्त्वाच्या ठिकाणचा मोठा गाळ तसाच राहून गेला होता. यामुळे नदीचे पात्र पुन्हा त्याच स्वरूपात पाहावयास मिळते. आंबेवाडी मार्कंडेय पुलाजवळील बंधार्‍याच्या पलिकडचा मोठ्या प्रमाणात असलेल्या गाळाचा उपसाच झालेला नव्हता. परिणामी त्याच्या आजुबाजूला पुन्हा गाळ साचला नसून नदीपात्राला झाडाझुडपांनी वेढा घातला आहे. 

कचर्‍याचीही भर

आंबेवाडी पुलाजवळील पात्रात मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून वाहून आलेल्या गाळापेक्षा आणून टाकलेला कचरा मोठा आहे. आंबेवाडी, हिंडलगा, मण्णूर, गोजगा आदी भागातील लोक पूजा साहित्य, देवाचे फोटो आदी कचरा व वस्तू फेकण्यासाठी मार्कंडेयचाच उपयोग करतात. आंबेवाडी बंधार्‍यालगत कचर्‍याचा मोठा ढीग साचला आहे. कचर्‍यामुळे नदीपात्राची हानी होण्याबरोबरच पावसाळ्यात पर्यावरण प्रदूषण तसेच जलप्रदूषण होत असते. पात्रात टाकलेला कचरा पावसाळ्यात येणार्‍या पुराच्या पाण्यासोबत पुहा शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन तिथे अडचण ठरत असतो. यामुळे नागरिकांनी नदीपात्रात कचरा टाकू नये, असे शेतकरी म्हणतात. 

आंबेवाडी, मण्णूर, गोजगा, अलतगा आदी भागात मोठ्या प्रमाणात उन्हाळी भाजीपाला, पिके घेतली जाते. मार्कंडेयकाठावरील शेतीमध्ये पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. यामध्ये नवलकोल, फ्लॉवर, कोबी, मिरची, कांदा, मुळा, कोथिंबीरचा समावेश असतो. या पिकांना उन्हाळ्यात पाणी पुरविताना शेतकर्‍यांना त्रास सहन करावा लागतो. यासाठी ठिकठिकाणी बंधारे घालून पाणी अडविण्याची आवश्यकता आहे. त्याआधी नदीतील गाळ उपसा योग्य प्रकारे झाला पाहिजे. योग्य जलनियोजन झाल्यास त्याचा फायदा शेतकर्‍यांबरोबरच नागरी वस्त्यांनाही होणार आहे.