होमपेज › Belgaon › मार्कंडेय कोरडी, मलप्रभाही मार्गावर

मार्कंडेय कोरडी, मलप्रभाही मार्गावर

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

उष्म्याची तीव्रता इतकी आहे बेळगाव तालुक्याची जीवनदायिनी असलेली मार्कंडेय नदी कोरडी पडली आहे. तर खानापूर तालुक्याची जीवनदायिनी मलप्रभाही कोरडी पडण्याच्या मार्गावर आहे. मलप्रभेत आता फक्‍त कुंडांत पाणी आहे.

मार्कंडेय नदी कोरडी पडली असून पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे.  या भागातही पाणी समस्येने ठाण मांडले असून ओढे, नाले कोरडे पडले आहेत.  मागील वर्षी मार्कंडेय नदी पुनरुज्जीवनासाठी केलेला कोट्यवधी रुपयांचा निधी वाया गेला आहे.  

मार्कंडेय नदी कोरडी पडल्याने तालुक्यातील अनेक गावात पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. पाऊसमान समाधानकारक असूनदेखील या भागातील जनतेला पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तालुक्याच्या पश्‍चिम भागात पाऊस अधिक प्रमाणात कोसळतो. मात्र, सध्या या भागातील जनतेला पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. 

जि. पं. ने मागील वर्षी कंग्राळी, आंबेवाडी, उचगाव, सुळगा, तुरमुरी, बेळगुंदी व बिजगर्णी या ग्राम पंचायतच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी रोजगार हमी योजनेतून खर्ची केला.  नदीच्या पात्रातील गाळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा कोणताही उपयोग झालेला नाही.

सध्या नदी पूर्णपणे कोरडी पडली आहे.

खानापूर : प्रतिनिधी

खानापूर शहरवासीयांच्या पाणी पुरवठ्याचा महत्त्वाचा आधार असणार्‍या मलप्रभेत एप्रिल अखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. कूपनलिकांच्या पाणी पातळीत दिवसेंदिवस घट होत असल्याने नदीतून होणार्‍या पाणी पुरवठ्याचा वापर वाढला आहे. परिणामी मे महिना खानापूरवासीयांना असह्य ठरण्याची शक्यता आहे. शहरातील 16 प्रभागांना पाणी 
पुरवठ्यासाठी 90 कूपनलिका आणि हँडपंपचा वापर केला जातो. पिण्यासाठी नागरिक या पाण्याचा वापर करतात. मात्र स्वच्छता, कपडे व भांडी धुण्यासाठी नदीतून होणार्‍या पाणी पुरवठ्याचाच वापर केला जातो. परिणामी नागरिकांची गरज ओळखून सध्या दररोज पाणी पुरवठा केला जात आहे. 

महादेव मंदिराजवळ कच्चा मातीचा बांध घालून पाणी अडविण्यात आल्याने वरील भागात बर्‍यापैकी पाणीसाठा शिल्लक आहे. जॅकवेलजवळील पाण्याची पातळी पाहता एप्रिल अखेपर्यंत पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरु राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र दोन दिवसाआड पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. 90 बोअरच्या सहाय्याने शहरात ठिकठिकाणी 180 टाक्या बसविण्यात आल्या आहेत. पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने या टाक्यांचे जाळे अजून वाढविण्याची गरज आहे.


  •