Wed, Apr 24, 2019 00:07होमपेज › Belgaon › मराठीतील बेकी आयतीच पथ्यावर

मराठीतील बेकी आयतीच पथ्यावर

Published On: Feb 10 2018 1:28AM | Last Updated: Feb 09 2018 10:29PMबेळगाव : प्रतिनिधी

गेल्या दहा वर्षांपासून समितीत बेकीचे, दुहीचे चित्र आहे. समितीच्या विजयासाठी मराठी भाषकांचे एकेक मत महत्त्वाचे असते. बेकीच्या राजकारणामुळे इतर राजकीय पक्ष या मतांचे ध्रुवीकरण करू पाहत आहेत. त्यांना समितीतील गटातटामुळे आयती संधी चालून आली आहे. यामुळे गेल्या काही वर्षांत समितीच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. इतर पक्षांच्या मतांच्या टक्केवारीत झपाट्याने वाढ होते आहे. हे कशाचे लक्षण आहे? युवा कार्यकर्त्यांनी नेमक्या याच वर्मावर बोट ठेवून समितीच्या नेत्यांना जाब विचारून एकी करण्याची मागणी लावून धरली आहे.

युवकांच्या प्रयत्नांना नेत्यांचा कितपत सकारात्मक प्रतिसाद मिळतो, यावरच आगामी निवडणुकीची समीकरणे अवलंबून आहेत. एकीचे प्रयत्न निष्फळ ठरले तर या कार्यकर्त्यांंची आगामी दिशा वा रणनीती काय राहील याचाही नेत्यांनी विचार केला पाहिजे, असा मतप्रवाह आहे. प्रत्येक निवडणुकीआधी उमेदवारीचा मुद्दा उपस्थित केला जातो. केवळ राजकारणासाठी तो उपस्थित केला जात असेल आणि यातून बेकीला चालना मिळत असेल तर ते आक्षेपार्ह ठरते. हे राजकारण 1982 पासून सुरू झाले आणि यातली दरी कमी होण्याऐवजी रुंदावत गेली. 

सीमाप्रश्नाचे राजकारण स्वार्थासाठी करणारे नेते स्वार्थ त्यागून एकीला सिध्द होतील, याची शक्यता सध्या तरी दिसत  नाही. हाच धागा पकडून एक मुद्दा चर्चेला यायला हवा. सीमाभाग महाराष्ट्रात   सामील व्हावा,  यासाठी गेली 60 वर्षे समिती लढा देत आली आहे. हे न्यायोचित आहे. पण आणखी 25 वर्षांनंतर मायमराठी या भागात टिकून राहील का, हाही एक प्रश्न आहेच. खुद्द महाराष्ट्रातील मराठी शाळांची अवस्था दयनीय बनू पहात आहे. ‘मराठी’ भाषिक कमी होत आहेत. तेथे इंग्रजी आणि कर्नाटकात कन्‍नडमुळे मराठीवर संक्रांत आली आहे. आधी मराठी टिकली पाहिजे, तर पुढचे सगळे काही...यासाठी कार्यकर्ते आणि समितीने पुढाकार घ्यायला हवा, अन्यथा मराठी आणि मराठमोळ्या संस्कृतीचे अस्तित्व सीमित होत जाईल, असे मराठी भाषिकांचे म्हणणे आहे.