होमपेज › Belgaon › अखेर मराठी मतदार याद्या दाखल !

अखेर मराठी मतदार याद्या दाखल !

Published On: Apr 19 2018 1:34AM | Last Updated: Apr 18 2018 10:41PMखानापूर : प्रतिनिधी

मराठी भाषिकांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर अखेर मराठी भाषेतील मतदार याद्या तहसीलदार कार्यालयामध्ये दाखल झाल्या असून, त्यांची पडताळणी करुन कन्नड याद्यांशी समानता आढळल्यास लवकरच त्या नागरिकांना उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. तथापि, उमेदवारी अर्ज मात्र अजूनही मराठीतून उपलब्ध झालेले नाहीत.मराठी मतदारांना आपली नावे शोधताना कन्नड भाषेतील याद्यांमुळे अडचणींचा सामना करावा लागत होता. ती अडचण आता दूर होणार आहे.

निवडणुकीच्या आधी मराठी मतदार याद्यांचे काम पूर्ण करुन त्या वेळेत उपलब्ध करुन देण्याची मागणी मराठी भाषिकांच्यावतीने करण्यात आली होती. नेहमीप्रमाणे प्रशासनाने याबाबत संथगतीने कार्यवाही चालविल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात होता. अर्ज दाखल करण्याचा दिवस आला तरी मराठीतून मतदार याद्या उपलब्ध करुन देण्याकडे दुर्लक्ष केले जात होते. 

मात्र निवडणूक अधिकार्‍यांनी उमेदवार व मतदारांची गैरसोय लक्षात घेऊन दोन दिवसांत मराठी मतदार याद्या उपलब्ध करुन देण्यासाठी तहसीलमधील अधिकार्‍यांना कामाला लावले होते. त्यानुसार आज मराठी याद्या दाखल झाल्या. त्यांच्या पडताळणीचे काम सुरु असून जर त्या दोषमुक्त आढळल्यास लवकरच नागरिकांना उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.

पाच जणांना प्रवेश

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात केवळ पाच जणांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यामध्ये उमेदवार व दोन  साक्षीदारांचा समावेश आहे. गर्दीमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ नये. यासाठी तहसीलच्या प्रवेशद्वारावर बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

अजूनही अर्ज नाही

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला मंगळवार दि. 17 पासून सुरुवात झाली असली तरी पहिल्या दिवशी खानापुरात एकही अर्ज दाखल झाला नाही. दि. 18 रोजी साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहूर्ताचा योग होता. मात्र बसव जयंतीच्या सुट्टीमुळे अनेकांना इच्छा असूनही उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही. त्यामुळे उद्या गुरुवारपासून उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.

उमेदवारी अर्ज केवळ कन्नड, इंग्रजीतूनच !

कन्नड आणि इंग्रजीतून उमेदवारी अर्ज दिले जात आहेत. त्यामुळे मराठी भाषिक उमेदवारांना अर्ज भरताना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. दरवेळेच्या विधानसभा निवडणुकीत उपरोक्त दोन भाषातूनच उमेदवारी अर्ज उपलब्ध करुन देण्याची पद्धत आहे. त्यामुळे याहीवेळेस केवळ कन्नड आणि इंग्रजीतूनच उमेदवारी अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले असून मराठीतून उमेदवारी अर्ज देणे टाळण्यात आले आहे.