Sun, Aug 25, 2019 04:04होमपेज › Belgaon › मराठी वर्चस्वाला धक्‍का लावण्याचे षड्यंत्र

मराठी वर्चस्वाला धक्‍का लावण्याचे षड्यंत्र

Published On: Feb 14 2018 1:55AM | Last Updated: Feb 14 2018 12:28AMबेळगाव : प्रतिनिधी

महापौर आरक्षणाविरोधात मराठी नगरसेवकांनी दंड थोपटले असून यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. नगरसेवक अ‍ॅड. रतन मासेकर यांनी उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यावर उच्च न्यायालयाने नगरविकास खाते, प्रादेशिक आयुक्त व मनपाला नोटीस बजावली आहे. याची सुनावणी येत्या 20 रोजी होणार आहे. यामुळे महापौर निवड प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

महापौर संज्योत बांदेकर यांचा कार्यकाळ संपल्यामुळे महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. यातून सताधारी मराठी गटाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा कुटिल कावा उघड झाला आहे. सध्या महापौरपद अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. 

शहरात अनुसूचित जमातीची लोकसंख्या केवळ 3 टक्के आहे. मनपामध्ये केवळ दोन नगरसेवक सदर प्रवर्गाचे असून हा इतर नगरसेवकांवर अन्याय आहे. त्याचबरोबर महानगरपालिका  निवडणूक कायद्यातील कलम 73 ‘अ’ चे उल्लंघन झाले आहे. यापूर्वी कधीही या प्रवर्गासाठी महापौरपदाचे आरक्षण जाहीर केलेले नाही. यावेळी सताधारी गटाकडे सदर प्रवर्गाचा नगरसेवक नसल्यामुळे जाणीवपूर्वक आरक्षण जाहीर केल्याचा मुद्दा याचिकेत दाखल करण्यात आला आहे.

जानेवारी महिन्यात महापौर-उपमहापौर पदाचे आरक्षण नगरविकास खात्याने जाहीर केले आहे. त्यानंतर मराठी नगरसेवकांनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार 8 फेब्रुवारी रोजी सदर याचिका दाखल करण्यात आली आहे. 

यामध्ये प्रादेशिक आयुक्त, नगरविकास खाते, मनपाला प्रतिवादी करण्यात आले असून त्यांना न्यायालयाने नोटीस बजावली आहे.  यावर मंगळवार दि. 20 रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, सुनावणीकडे मनपाचेच नव्हे तर बेळगावातील नागरिकांचेही लक्ष लागून राहिले आहे.

याचा निर्णय काय लागतो, यावर आरक्षणाची समीकरणे अवलंबून आहेत. राज्य सरकारची कुटिल कारस्थाने मात्र सुरू राहतील, यात शंका नाही. यामुळे मराठी भाषक नगरसेवक आणि त्यांच्या नेत्यांनी खंबीर भूमिका घेऊन सुनावणीनंतर काय होऊ शकते, याचा सारासार विचार करून व्यूहरचना आखायला हवी, असे मराठी भाषकांचे म्हणणे आहे. 

सरकारची संभाव्य कारस्थाने आणि षड्रयंत्र ओळखून मराठी नगरसेवकांनी एकसंध आणि अभेद्य राहायला हवे. फुटीची संधी देता कामा नये.