Tue, Apr 23, 2019 13:50होमपेज › Belgaon › मराठी शाळा वाचवा अभियान सोशल मीडियावर

मराठी शाळा वाचवा अभियान सोशल मीडियावर

Published On: Jun 19 2018 1:33AM | Last Updated: Jun 18 2018 8:59PMबेळगाव : प्रतिनिधी

सरकारी मराठी  शाळा वाचल्या पाहिजेत. यापूर्वी गजबजलेल्या मराठी शाळा ओस पडत चालल्या आहेत. सरकारी व खासगी शाळांबद्दल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. त्यासंबंधी संदेश, व्हिडिओ व्हायरल होत आहेत. मात्र प्रत्यक्षात वास्तव वेगळे आहे. शाळा वाचविण्यासाठी प्रत्यक्षात कृतीच दिसत नाही.

सोशल नेटवर्कवर सरकारी मराठी शाळा वाचविण्यासंदर्भात संदेश, व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सरकारी व खासगी शाळेची इमारत यांचे फोटो व्हायरल होत आहेत.  सरकारी शाळेत शिकवित असलेल्या शिक्षकाचा बंगला व खासगी शाळेत शिकवित असलेल्या शिक्षकाचे कौलारु घर याचे फोटोदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत असून एकमेकाची तुलना करण्यात येत आहे. 

माझी गावची शाळा वाचली पाहिजे, यासाठी माजी विद्यार्थ्यांनी एकत्र आले पाहिजे. त्यानी दिलेल्या आर्थिक निधीतून शाळेचा कायापालट पहिल्यांदा झाला पाहिजे. जेणेकरुन पालक व प्रवेश घेऊ पाहणारी मुले शाळेकडे आकर्षिली जातील. सरकारी मराठी शाळा वाचविण्यासाठी प्रत्यक्षात एप्रिलपासून जनजागृती मोठ्या प्रमाणात व्हायला हवी होती. 

आता उशीर झाला असला तरी, पुढील वर्षी पालकांनी सरकारी शाळेत आपल्या मुलांना घालण्यासाठी आतापासूनच सरकारी शाळा स्मार्ट करण्यावर भर दिला पाहिजे. शैक्षणिक दर्जा सुधारण्यास प्राधान्य द्यायला हवे होते. 

सरकारी मराठी शाळेबरोबर कन्नड शाळादेखील बंद पडत चालल्या आहेत. यंदा तीन हजारहून अधिक शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. शहरात तर खासगी शाळेचे प्रस्थ वाढल्याने सरकारी शाळेत प्रवेश घेण्याकडे पालकांनी दुर्लक्ष चालविले आहे. 

कारण सरकारी शाळेत शिकवित असलेल्या शिक्षकांनी आपल्या मुलांना खासगी शाळेत घातल्याने इतर पालकांनीही त्यांचीच री ओढली आहे. यामुळे सरकारी शाळेत मुले मिळविणे अवघड होत आहे. 
ग्रामीण भागातील सरकारी शाळा पटसंख्येने गजबजलेल्या असत. आता त्या ठिकाणीही खासगी शाळा सुरु झाल्याने पालकवर्गाचा ओढा साहजीकच खासगीकडे वाढला आहे.