Thu, Apr 25, 2019 17:45होमपेज › Belgaon › मेळाव्यात एकवटणार मराठी भाषिक

मेळाव्यात एकवटणार मराठी भाषिक

Published On: Feb 24 2018 1:15AM | Last Updated: Feb 23 2018 9:08PMबेळगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील पश्‍चिम भागातील गटातटात विखुरलेेले कार्यकर्ते मराठी भाषादिनी बेळगुंदीत एकवटणार असून युवा मेळाव्यात संघटित ताकद दाखवून देण्यात येणार आहेत. यासाठी युवा कार्यकर्ते कार्यरत झाले असून गुरुवारी बेळवट्टी परिसरात झंझावाती जागृती फेरी काढण्यात आली. त्याला व्यापक प्रतिसाद लाभला.

बेळगुंदी येथील कल्मेश्‍वर चौकात मेळाव्याचे आयोजन केले आहे. कोल्हापूर जि. प. चे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने व मुंबई येथे झालेल्या सकल मराठा मोर्चात आपल्या वक्तृत्वाने वादळ निर्माण केलेली आठ वर्षीय सई कुंडलिक पाटील उपस्थित राहणार आहे.

मेळाव्याच्या निमित्ताने या भागातील कार्यकत्यार्ंमध्ये निर्माण झालेली मतभेदाची दरी दूर झाली असून सर्वांनी एकत्रितपणे मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार केला आहे. यामुळे तालुक्यातील मराठी भाषकांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मेळाव्यात एकीचे प्रतिबिंब उमटणार असून याची उत्सुकता नागरिकांना लागून राहिली आहे.

मेळाव्याची जागृती मोहीम हाती घेण्यात आली असून त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. गुरुवारी बेळवट्टी, बडस, बाकनूर, बिजगर्णी येथील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला. 

बाकनूर येथे झालेल्या बैठकीत युवा आघाडी अध्यक्ष रवळू गोडसे म्हणाले, मराठी भाषकांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. मराठी भाषक विखुरल्यास त्याचा फायदा राजकीय पक्षांना होतो. यामुळे कोणत्याही आमिषांना बळी न पडता मराठी जनतेने सीमाप्रश्‍नाचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत एकत्रित राहणे आवश्यक आहे. 

बेळवट्टी ग्रामस्थांच्यावतीने पाठिंबा व्यक्त करताना ता. पं. सदस्य एन. के. नलवडे म्हणाले, पश्‍चिम भाग  मराठी भाषकांचा बालेकिल्ला आहे. हा अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येक मराठी भाषकाने आपली भाषा, संस्कृती आणि सीमाप्रश्‍नाशी प्रामाणिक राहावे. राजकीय नेत्यांकडून मराठी जनतेच्या एकीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. तो हाणून पाडण्यासाठी मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

किरण मोटणकर म्हणाले, सीमाप्रश्‍न अंतिम टप्प्यात असल्यामुळे मराठी जनतेला सावध राहावे लागणार आहे. न्यायालयात लोकेच्छा प्रकट करण्यासाठी एकी महत्त्वाची ठरणार असून समितीच्या झेंड्याखाली सर्वांनी एकत्र यावे.

राजू किणेकर, नागेश पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. नारायण गोडसे, विठ्ठल मजुकर, भीमाण्णा हसबे, तुकाराम पाटील, यल्लाप्पा बेळगावकर, संजय सावंत, म्हात्रू मजुकर, मंगेश हसबे, विठ्ठल गोडसे, सातेरी पाटील, नामदेव मजुकर, मधू गोडसे, शंकर मजुकर आदी उपस्थित होते.