Wed, Sep 26, 2018 07:17होमपेज › Belgaon › भेदभावावरून गदारोळ

भेदभावावरून गदारोळ

Published On: Sep 07 2018 1:04AM | Last Updated: Sep 06 2018 10:35PMबेळगाव : प्रतिनिधी

खानापूर तालुक्यात कन्नड भाषिकांबरोबर मराठी भाषिक मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे शिक्षक दिन निमंत्रण पत्रिका दोन्ही भाषेत काढण्यात येतात. परंतु, यावेळी प्रथमच केवळ कन्नड भाषेत निमंत्रण पत्रिका काढण्यात आली. ता. पं. कार्यकारी अधिकार्‍यांनी तालुक्यात भाषिक राजकारण सुरू केल्याची तक्रार जि. पं. सदस्यांनी केली. संबंधित अधिकार्‍यावर कारवाईची मागणी केली. जि. पं. सर्वसाधारण सभेत खानापूर तालुक्यातील जि. पं. सदस्यांनी मराठी-कन्नड निमंत्रण पत्रिकेचा मुद्दा उपस्थित केला. ता. पं. कार्यकारी अधिकारी मराठी-कन्नड भेदभाव करत असल्याची तक्रार केली. 

शिक्षकदिनाचा कार्यक्रम तालुका पंचायतच्यावतीने बुधवारी आयोजित केला होता. तालुक्यात मराठी भाषिकांची संख्या अधिक आहे. यामुळे आजवर प्रत्येक कार्यक्रमाची पत्रिका कन्नडबरोबर मराठीतून काढण्यात येते. परंतु, पहिल्यांदाच केवळ कन्नड भाषेतून निमंत्रणपत्रिका काढण्याचा प्रकार ता. पं. कार्यकारी अधिकार्‍यांनी केला. परिणामी मराठी भाषिकांनी शिक्षकदिन कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. याचे पडसाद जि. पं. सर्वसाधारण बैठकीत उमटले.
कन्नड भाषिक जि. पं. सदस्य जितेंद्र मादार म्हणाले, खानापूर तालुक्यात आजवर मराठी- कन्नड भाषिक वाद नाही. कन्नडबरोबर मराठीतून निमंत्रणपत्रिका काढण्यात येते. मात्र, यावर्षी अधिकार्‍यांनी मनमानी करत केवळ कन्नड भाषेत पत्रिका काढल्या. यामुळे तालुक्यात निष्कारण मराठी-कन्नड असा वाद निर्माण झाला आहे.

खानापूर तालुका विकास आढावा बैठक घेण्यात आलेली नाही. यामुळे तालुक्याचा विकास रखडला आहे. ता. पं. कार्यकारी अधिकारी हे शिक्षण खात्यातील आहेत. त्यांचा आणि ग्रामविकास आणि पंचातराज खात्याचा संबंध नाही. यामुळे त्यांची तात्काळ बदली करावी, अशी मागणी केली. त्याला म. ए. समितीचे सदस्य जयराम देसाई, परशराम कार्वेकर यांनी दुजोरा देऊन कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी आंबेडकर स्मारकाच्या जागेबाबत चर्चा करण्यात आली.

जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी  संबंधित अधिकार्‍याची चौकशी करण्यात येईल, असे आश्‍वासन बैठकीत दिले.