Tue, Apr 23, 2019 00:11होमपेज › Belgaon › बालवयातच साहित्याचे बाळकडू द्यावे

बालवयातच साहित्याचे बाळकडू द्यावे

Published On: Jan 28 2018 1:34AM | Last Updated: Jan 27 2018 10:54PMबेळगाव : प्रतिनिधी

बालसाहित्य संमेलनातून मराठीचा जागर सीमाभागाच्या कानाकोपर्‍यात जात आहे.  बालसाहित्याची निर्मिती करण्यासाठी  साहित्यिकाला बालपनात डोकावून पाहावे लागते. तरच चांगले साहित्य तयार होते. बालवयातच मुलाला साहित्याचे बाळकडू दिले पाहिजे, असे प्रतिपादन चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाचे प्रा. आप्पासाहेब कांबळे यांनी केले. 

निलजी (ता.बेळगाव) येथे शनिवारी (दि. 27) सातवे ग्रामीण मराठी बाल साहित्य संमेलन पार पडले. याप्रसंगी संमेलनाध्यक्ष म्हणून  ते बोलत होते. व्यासपीठावर संमेलन उद्घाटक जोतिबा मुतगेकर, अ‍ॅड. रमेश पाटील, गजानन मोदगेकर, कल्लाप्पा कोलकार, भाऊसाहेब गोजगेकर, अशोक मोदगेकर, रमेश मोदगेकर आदी उपस्थित होते. 

प्रा. कांबळे म्हणाले,  भारतीय संस्कृती महान आहे. मोबाईलमुळे संवाद नाहीसा झाला. टीव्ही आली आणि वाचन संस्कृती लोप पावत चालली. मैदानाची जागा मोबाईल गेमने घेतली. त्यामुळे हरवत चाललेल्या संवादाला पूर्णविराम दिला पाहिजे. भारताने तंत्रज्ञानात प्रगती केली तरी त्याचा अतिरेक होत आहे.  आजचे बालसाहित्यिक हे उद्याच्या आशेचे किरण आहेत.  बालसाहित्यातून होणारे संस्कार आपण जाणून घेतो का, हा महत्त्वाचा विषय आहे.

मुलांवर संस्कार करताना आपण फार कमी पडत आहे.  जिल्ह्यातील अनेक गावांत दरवर्षी यात्रा भरविल्या जातात. यावर वायफळ खर्च करण्यापेक्षा मुलांच्या शिक्षणासाठी तो पैसा वापरा. मराठी भाषेतील शब्द व वजनाची ताकद खूप मोठी आहे. यासाठी भाषेची जपणूक करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. बालपण हे रम्य असते. बालसाहित्यातून होणारे संस्कार आपण जाणून घेऊन आत्मसात करतो का, हा चिंतेचा विषय आहे. सीमाभागातील मराठी भाषेचे सौंदर्य बालकांना देणे गरजेचे आहे.   

यावेळी सुनील भोसले, राजू गोमाण्णाचे कलाप्पा कोलकार, प्रकाश धनगावडे, यल्लाप्पा मणगुतकर, बसवंत कडेमनी, गजानन मोदगेकर आदी उपस्थित होते. 

आकर्षक ग्रंथदिंडी, पुस्तक प्रदर्शनाला प्रतिसाद

निलजी (ता. बेळगाव) येथील रणझुंझार साहित्य अकादमी आयोजित सातव्या ग्रामीण बाल साहित्य संमेलनाची सुरुवात आकर्षक ग्रंथदिंडीने झाली. 

रणझुंझार को. ऑप. सोसायटी येथून ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. अ‍ॅड. रमेश पाटील यांच्या हस्ते पालखी पूजन झाले.  ब्रम्हलिंग मंदिर, मरगाई गल्ली, लक्ष्मी गल्ली, दुर्गादेवी मंदिरमार्गे दिंडी बांदेकर साहित्यनगरीत पोहोचली. यानंतर रणझुंझार हायस्कूलच्या पटांगणावर कार्यक्रम पार पडला. 

दिंडीमध्ये संमेलनाध्यक्ष प्रा. आप्पासाहेब कांबळे, संमेलन उद्घाटक जोतिबा मुतगेकर, प्रा. एम. एम. पाटील, सुनील पाटील, सी.वाय. पाटील, अशोकराव मोदगेकर, बसवंत कडेमनी, रणझुंझार शिक्षण संस्था, सोसायटी, युवक संघ, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. 

संमेलनस्थळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. संमेलनाचे उद्घाटन जोतिबा मुतगेकर, गणेश प्रतिमा पूजन विशाल पाटील, सरस्वती प्रतिमा पूजन विष्णू पाटील, शिवप्रतिमा पूजन राजू गोमाण्णाचे, महात्मा फुले प्रतिमा पूजन आनंद मोदगेकर, कै. लक्ष्मण मोदगेकर व्यासपीठ पूजन मधू कोले यांच्या हस्ते पार पडले. संमेलनस्थळी असलेल्या पुस्तक प्रदर्शनालाही विद्यार्थ्यांतून चांगला प्रतिसाद मिळाला. 

कै. रुक्मिणी मोदगेकर स्मृती चित्रकला स्पर्धांचा बक्षीस समारंभ पार पडला. 4 गटात स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यामधील विजेत्या स्पर्धाकांना संमेलनाध्यक्ष प्रा. कांबळे, अशोक मोदगेकर, भाऊसाहेब मोदगेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. 

दुपारी रणझुंझार हायस्कूल, विद्यामंदिर व इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. सूत्रसंचालन सी. वाय. पाटील यांनी केले.