होमपेज › Belgaon › मराठा समाजभवनाची निर्मिती प्रगतीपथावर

मराठा समाजभवनाची निर्मिती प्रगतीपथावर

Published On: Aug 12 2018 1:01AM | Last Updated: Aug 12 2018 1:01AMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगावात मराठा  समाज सुधारणा मंडळाची स्वमालकीची वास्तू नसल्याने मंडळाने स्वतंत्र वास्तू उभारण्याचा निर्णय घेतला असून, भवन बांधणीचे काम प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत 35 लाख रुपये खर्च झाला असून, इमारत पाच महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती  मराठा समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. 

शहापूर मेलगे गल्लीत मंडळाच्या 20 फूट रुंद आणि 40 फूट लांबीच्या जागेवर उभारण्यात येत असलेल्या या वास्तूला 50 लाख रु. खर्च अपेक्षित आहे.  स्वत:ची वास्तू नसल्याने सुधारणा मंडळाचे कामकाज शहापूर येथील तुकाराम बँकेच्या सभागृहात चालू आहे. बँकेचे ज्येष्ठ संचालक कै. अर्जुनराव दळवी यांनी तात्पुरती या जागेचा वापर करण्यास संमती देऊन गैरसोय दूर केली होती. 

मराठा समाज सुधारणा मंडळाची स्थापना 1923 साली ब्रिटीशकाळात झाली. म. ज्योतिराव फुले व राजर्षि शाहू महाराज यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन त्याकाळी समाजबांधवांनी एकत्र येऊन या संस्थेची स्थापना केली. 

विशेष म्हणजे मराठा संघ शहापूरच्या पदाधिकार्‍यांनी मराठा समाज सुधारणा मंडळाला आपली जागा देऊ केली. त्याच जागेवर मराठा समाज सुधारणा मंडळाची वास्तू आकार घेत आहे. समाज बांधवांनी केलेल्या आर्थिक मदतीमुळे भवनाचे काम प्रगतीपथावर असून उर्वरित कामासाठी निधीची गरज आहे. तरी समाजबांधवांनी या कामास आर्थिक हातभार लावावा, असे  आवाहनही अध्यक्षांनी केले. लवकरच तिसर्‍या मजल्याचे बांधकाम सुरू होणार आहे. हे बांधकाम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी मंडळाचे पदाधिकारी व प्रमुख समाजबांधव प्रयत्नशील आहेत.