Mon, May 20, 2019 20:06होमपेज › Belgaon › आरक्षणासाठी एकवटले सर्वपक्षीय मराठे!

आरक्षणासाठी एकवटले सर्वपक्षीय मराठे!

Published On: Aug 04 2018 1:32AM | Last Updated: Aug 03 2018 10:15PMखानापूर : प्रतिनिधी

कर्नाटकातील मराठा समाजाचा 2 अ वर्गात समावेश करावा, समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकासासाठी महामंडळाची स्थापना करण्यात यावी. तसेच समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ताबडतोब आरक्षणाचा निर्णय जाहीर करावा, या प्रमुख मागण्यांसाठी खानापुरातील सर्वपक्षीय मराठा बांधवांनी एकीची वज्रमूठ आवळली आहे.

येत्या बुधवार दि. 8 रोजी सकाळी 11 वा. तहसीलदार, आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधींना मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन देण्याचा निर्णय गुरुवारी सायंकाळी झालेल्या समाजाच्या बैठकीत घेण्यात आला.

पक्ष, प्रांत, भाषा आणि राजकारण बाजूला ठेवून आरक्षणाची लढाई लढल्यास एकीच्या बळातून यशाचे फळ चाखता येणार असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. तालुक्यातील मराठा समाजाला आरक्षणाची मागणी कळावी, यासाठी जि. पं. विभागवार समित्या नेमून जागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला. संघटनेत काम करताना कोणतेही राजकारण आणले जाणार नाही. 100 जणांची संयोजन समिती स्थापून त्याद्वारे आगामी आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. मराठा समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी निधी उभारण्यात येणार असून या कामासाठी 25 जणांनी रोख एक हजार रु. ची देणगीही सुपूर्द केली.

आमदार, खासदार, विधानपरिषद सदस्य, पालकमंत्री आदींना मराठा आरक्षणाची गरज समजावून सांगून राज्यातील मराठा समाजाला न्याय देण्याची मागणी केली जाणार आहे. याची सुरुवात खानापुरातून बुधवारी निवेदन देऊन केली जाईल. सकाळी 11 वा. तहसीलदाराना निवेदन सादर केले जाणार आहे. त्यानंतर आ. अंजली निंबाळकर यांना निवेदन देण्यात येईल. केंद्रीय कौशल्य राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे, पालकमंत्री रमेश जारकिहोळी, आम. विवेक पाटील, महांतेश कवटगीमठ आदींना निवेदन देऊन विधिमंडळात मराठा आरक्षणप्रश्‍नी आवाज उठविण्याची मागणी केली जाणार आहे.

यशवंत बिर्जे यांनी प्रास्ताविक केले. दिलीप पवार, विठ्ठल हलगेकर, मुरलीधर पाटील, आबासाहेब दळवी, प्रकाश चव्हाण, विलास बेळगावकर, संजय कुबल, महादेव कोळी, बाळासाहेब शेलार, अनिल पाटील, प्रवीण सुळकर, अविनाश पाटील आदी उपस्थित होते. भरमा पाटील यांनी आभार मानले.

बुधवारी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

बुधवारी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना तसेच आ. डॉ. अंजली निंबाळकर यांना मराठा समाजाच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन दिले जाणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी सकाळी 10 वा. शिवस्मारक येथे मराठा बांधवांनी जमावे, असे आवाहन करण्यात आले आहे.