Mon, Aug 19, 2019 11:06होमपेज › Belgaon › ‘कर’नाटकी थयथयाट!

‘कर’नाटकी थयथयाट!

Published On: Aug 03 2018 1:33AM | Last Updated: Aug 03 2018 12:21AMहमीदवाडा/निपाणी : प्रतिनिधी

सेनापती कापशी (ता. कागल) येथून निघालेला मराठा आरक्षणासाठी 60 कि. मी. अंतराचा पायी लाँगमार्च लिंगनूर कापशीनजीक महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवर येताच, कर्नाटक पोलिसांनी अडविल्याने सीमेवरच आंदोलक कार्यकर्ते व कर्नाटक पोलिस यांच्यात जोरदार वादावादी झाली. यावेळी आंदोलकांनी ‘कर’नाटकी थयथयाटाविरोधात तीव्र संताप व्यक्‍त केला. कर्नाटक पोलिसांना व त्यांच्या वाहनांना कर्नाटक हद्दीत पिटाळून लावले. दरम्यान, उत्तर कर्नाटक या स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी कर्नाटकात बंद असल्याचे सांगत कर्नाटक पोलिसांनी कर्नाटक हद्दीतून जाण्यास विरोध केल्याने अखेर महाराष्ट्र हद्दीपर्यंत वाहनातून जावे व तिथून पुन्हा पायी जावे, असा तोडगा काढण्यात आला.

चिकोत्रा खोर्‍यातून सकल मराठा समाजाने दसरा चौक कोल्हापूर येथील आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी या पायी लाँगमार्चचे आयोजन केले. त्यानुसार सेनापती कापशी येथून हुतात्मा स्वामी चौकातून या मोर्चास प्रारंभ झाला. या मोर्चाचे एक प्रमुख संघटक शशिकांत खोत यांच्या हस्ते प्रारंभ झाला. शिस्तबद्धपणे हा लाँगमार्च लिंगनूरहून निपाणीच्या दिशेने चालू लागला, तेव्हा महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमेवर कर्नाटक पोलिसांनी आंदोलकांना अडविले. उत्तर कर्नाटक राज्य मागणीसाठी कर्नाटक बंद असल्याने आपणास अशा पद्धतीने जाता येणार नाही, अशी भूमिका कर्नाटक पोलिसांनी घेतली. मोर्चाचे आयोजक शशिकांत खोत यांनी आम्ही आपणास लेखी पत्र अगोदरच दिले आहे.

त्याची पोहोचही आमच्याकडे आहे, असे सांगितले. पत्र मिळाले आहे; पण आमच्याकडून आपणास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे कर्नाटक हद्दीतून जाता येणार नाही. यावर निपाणीचे सी. पी. आय. किशोर भरणी व अन्य अधिकारी ठाम राहिले. त्यामुळे आंदोलकांना संताप अनावर झाला. परवानगी नसल्याचेही अगोदर पोलिसांनी का कळविले नाही, हा आंदोलकांचा सवाल होता. यावेळी आंदोलक व पोलिस यांच्यात जोरदार वाद झाला. मोर्चेकर्‍यांनी छत्रपती शिवाजी महाराज, सकल मराठा समाज यांच्या घोषणा दिल्या. त्याचबरोबर कर्नाटक पोलिसांच्या अरेरावीच्या विरोधातदेखील निषेधात्मक घोषणा दिल्या.

कर्नाटक पोलिस आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे लक्षात आल्यानंतर महाराष्ट्र हद्दीत आंदोलकांनी ठिय्या मांडला. त्यामुळे काही काळ वाहतूक थांबली. याचवेळी निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील तसेच माजी नगरसेवक संजय सांगावकर, बाळासाहेब सूर्यवंशी आदी कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीही कर्नाटक पोलिसांशी चर्चा केली. चालत न जाता वाहनातून या सर्व आंदोलकांनी कर्नाटक हद्दीतून पुढे जावे, असा तोडगा काढण्यात आला. यामुळे निपाणी येथील भोजनाचा विराम रद्द करून तेथील जेवण लिंगनूर कापशी येथे आणण्यात आले व या ठिकाणी पोलिसांसह सर्वांना जेवण वाढण्यात आले. यासाठी निपाणी येथील मराठा बांधव कार्यकर्त्यांचे महत्त्वाचे सहकार्य लाभले. दरम्यान, आ. हसन मुश्रीफ तसेच निपाणीचे माजी आमदार सुभाष जोशी, भैया माने हे लिंगनूर कापशी येथे आले. त्यांनी शशिकांत खोत व आंदोलकांशी चर्चा केली. आ. मुश्रीफ यांनी पाच ट्रकचे नियोजन करून कागलपर्यंत आंदोलकांना येण्याचे आवाहन केले. त्यांनी सीमेवर तैनात असणार्‍या निपाणी पोलिसांशी चर्चा केली.

पोलिस बंदोबस्तात वाहने

लिंगनूर कापशी ते दूधगंगा नदी (राष्ट्रीय महामार्ग) हे सुमारे 18 ते 20 कि. मी. चे अंतर वाहनातून पार करण्यात आले. दूधगंगा नदीच्या पुढे महाराष्ट्र हद्दीत आल्यानंतर हे सर्व आंदोलक पुन्हा पायी कागलमध्ये दाखल झाले. कर्नाटक हद्दीतून वाहने येत असताना महाराष्ट्र व कर्नाटकातील आठ ते दहा पोलिस गाड्या बंदोबस्तासाठी तैनात होत्या.

तुमच्या हद्दीतून बोला...!

कर्नाटक हद्दीतून जाण्यास कर्नाटक पोलिसांनी तीव्र विरोध करताच आंदोलकांच्या भावना संतप्त झाल्या. कर्नाटक पोलिस ऐकेनात व त्याचवेळी कर्नाटक पोलिस कर्मचारी व त्यांचे वाहन हे नेमके महाराष्ट्र हद्दीत होते. याचाच संदर्भ देत आम्हाला जाऊ देत नाही, तर पहिल्यांदा तुमचे वाहन व तुम्ही कर्नाटक हद्दीत जायचे व तेथून जे असेल ते बोलायचे.