होमपेज › Belgaon › आरक्षण हवेच, सीमाप्रश्‍न सोडवा

आरक्षण हवेच, सीमाप्रश्‍न सोडवा

Published On: Jul 30 2018 1:28AM | Last Updated: Jul 30 2018 12:18AMबेळगाव : प्रतिनिधी

एके काळी जमीनदार म्हणून ओळखला जाणारा मराठा समाज आज भूमिहीन झाला आहे. आर्थिकदृष्ट्या मागास आहे. यामुळे कोणत्याही समाजाचे सध्याचे आरक्षण कमी न करता मराठा समाजाच्या हक्‍काचे आरक्षण द्यावे, अशी मागणी सकल मराठा समाज बेळगाव आणि चंदगड यांच्या वतीने करण्यात आली. तसेच लोंबकळत पडलेला सीमाप्रश्‍न सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याचीही मागणी करण्यात आली. शिनोळी येथे रविवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

उपरोक्‍त मागण्यांचे निवेदन चंदगडचे नायब तहसीलदार एम. टी. झाजरी यांना देण्यात आले. यावेळी मराठा समाजबांधव आणि विविध पक्षांचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरक्षण देण्यास टाळाटाळ करणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आंदोलकांच्या वतीने निषेध व्यक्‍त करण्यात आला.

म. ए. समिती, शिवसेनेचे नेते सहभागी झाले होते. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. संयम, शांतता, शिस्त या त्रिसूत्रीचा अवलंब करत 58 मराठा क्रांती मोर्चे यशस्वी केले आहेत. असे असतानाही राज्यकर्त्यांकडून मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात होत आहे. आरक्षणाला विलंब करण्यात येत आहे. चालढकल केल्यास समाजात अराजकता माजण्याचा धोका आहे. स्वातंत्र्यानंतर मराठा समाजाला आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक स्तरांचा विचार करून आरक्षण मिळायला हवे होते, असे निवेदनात नमूद ओह. 

भाषावार प्रांतरचना झाली आणि सीमाभागातील मराठी भाषकांचे सांस्कृतिक उद्ध्वस्तीकरण सुरू झाले. कर्नाटकी रानटी अत्याचारांनी परिसीमा गाठली. देशाच्या एकात्मतेला तडा जाण्याचे काम कर्नाटक सरकारने चालविले आहे. मागील 62 वर्षांपासून हा लढा सुरू आहे. लोकशाहीतील सर्व मार्ग चोखाळूनदेखील राज्यकर्त्यांना जाग येत नाही. सीमावाद केंद्राला सोडविता आलेला नाही. यातून सांस्कृतिक व भाषिक शोषण आणि उद्ध्वस्तीकरण सुरू आहे. यासाठी महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने पुढाकार घेऊन प्रश्‍न सोडवावा, अशी मागणी मांडण्यात आली.

सकल मराठा मोर्चाचे संयोजक प्रकाश मरगाळे, मध्य. म. ए. समितीचे कार्याध्यक्ष माजी आ. मनोहर किणेकर, शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे, संग्रामसिंह कुपेकर, शिवसेना बेळगाव जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर आदींनी मनोगत व्यक्‍त केले.कोल्हापूर जिल्हा शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रभाकर खांडेकर, जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, बी. एस. पाटील, नगरसेविका सरिता पाटील, एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, ता. पं. सदस्य रावजी पाटील, भाउराव गडकरी, आर. आर. पाटील, विकास कलघटगी,  गुंडू गुंजीकर, ईश्‍वर गुरव, दिगंबर पवार, प्रकाश पाटील, गणेश दड्डीकर, मदन बामणे, सुनील जाधव, विनायक पाटील, रणजित हावळण्णाचे आदींसह बेळगाव, चंदगड तालुक्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बेळगावातून सुरवात

शिनोळी येथील रास्तारोकोमध्ये बेळगाव आणि चंदगड तालुक्यातील मराठा समाजबांधवांनी भाग घेतला. येथील धर्मवीर संभाजी चौकातील धर्मवीर संभाजी पुतळ्याला संयोजक प्रकाश मरगाळे, मनोहर किणेकर, विजय देवणे यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. यानंतर शिनोळीकडे आंदोलकांनी  कूच केली. बेळगाव तालुक्याच्या वेगवेगळ्या भागातून बांधव आंदोलनात सहभागी झाले. आंदोलन संपल्यानंतरही अनेक गावातून आंदोलक येत होते. यावेळी सीमाप्रश्‍नाच्या घोषणा घुमल्या.