Sun, Jul 12, 2020 21:45होमपेज › Belgaon › ‘दुर्योधनां’समोर आव्हानांचा ‘चक्रव्यूह’

‘दुर्योधनां’समोर आव्हानांचा ‘चक्रव्यूह’

Published On: Jun 19 2018 1:33AM | Last Updated: Jun 18 2018 9:11PMबेळगाव : प्रतिनिधी

अनुसूचित जातीसाठी राखीव असणार्‍या रायबाग मतदारसंघातून आ. दुर्योधन ऐहोळे यांनी सलग तिसर्‍यांना विजय मिळविला आहे. मागील दहा वर्षापासून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणार्‍या आ. ऐहोळे यांच्यासमोर अनेक समस्या ठाण मांडून बसल्या आहेत. आव्हानांचा चक्रव्यूह त्यांना भेदण्याचे काम येत्या काळात  करावे लागणार आहे.

मतदारसंघात अनेक बाबतीत काँग्रेस प्रबळ असूनदेखील गटबाजीमुळे भाजपला फायदा झाला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रदीपकुमार माळगी यांच्याविरोधात महावीर मोहिते यांनी बंडखोरी केली. यामध्ये ऐहोळे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. 

मतदारसंघाचा तोंडवळा पूर्णपणे ग्रामीण आहे. अनेक खेडी मिळून हा मतदारसंघ बनला आहे. परिणामी ग्रामीण भागाला सतावणार्‍या सर्वच समस्या याठिकाणी ठाण भेडसावत आहेत. पिण्याचे पाणी, सांडपाणी निचरा, सिंचन प्रकल्प, रस्ता समस्या, ऊसदराचा तिढा, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, दुष्काळाच्या झळा, सरकारी योजनांचा दुरुपयोग आदी कारणांनी नागरिक त्रस्त बनले आहेत.

हा भाग कमी पर्जन्यमान असणारा म्हणून ओळखला जातो. दुसरीकडे कृष्णा नदीचा काही गावांना लाभ होतो. या ठिकाणी उसाचे मुबलक उत्पादन घेतले जाते. परंतु, या भागातील कारखाने अडचणीत सापडले आहेत. शेतकर्‍यांची अनेक वर्षांची बिले थकली आहेत. यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक भुर्दंड पडला असून याकडे प्रशासनाने कानाडोळा केला आहे.

शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कोणताही मोठा सिंचन प्रकल्प राबविण्यात आलेला नाही. निवडणुकीच्या तोंडावर उद्घाटन करण्यात आलेला प्रकल्प अद्याप बंद आहे. यामुळे शेतकर्‍यांना पारंपरिक पाण्याच्या स्रोतावर अवलंबून शेती व्यवसाय करावा लागतो. पावसाच्या बेभरवशी आगमनामुळे शेतीची समस्या गंभीर बनत चालली आहे. यातून आत्महत्येचे प्रकार घडत आहेत. यावर प्रतिबंध करण्यासाठी ठोस उपाययोजना आखण्याची आवश्यकता आहे.  आ. दुर्योधन ऐहोळे यांना मतदारांनी दाखविलेल्या विश्‍वासाला पात्र राहण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. 

मतदारसंघात आव्हानांचा चक्रव्यूह भेदण्यासाठी आ. ऐहोळे यांना आगामी पाच वर्षात प्रयत्न करावे लागणार आहेत. अन्यथा मतदारांची अपेक्षा फोल ठरण्याचा धोका आहे.

जपाव्यात राजर्षींच्या स्मृती 

रायबाग भाग कोल्हापूर संस्थानचा होता. यामुळे राजर्षि शाहू छत्रपती यांनी या ठिकाणी अनेक विकासकामे राबविली. त्यांच्या स्मृती सांगणार्‍या अनेक वास्तू आहेत. इतिहासाचा वारसा सांगत त्या आज अस्तित्वासाठी झुंज देत आहेत. ऐतिहासिक तलाव, राजवाडा, शाळा अडचणीत आल्या आहेत. रायबागच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा असणार्‍या शाहूंच्या स्मृती जपण्याचे प्रयत्न होणे अत्यावश्यक  आहे. 

ऊस समस्या 

मतदारसंघात प्रामुख्याने कोरडवाहू शेती अधिक आहे. पर्जन्यमान अत्यल्प असते. यामुळे शेतकर्‍यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कृष्णाकाठावरील शेतकर्‍यांकडून मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादन घेण्यात येते. मात्र काही वर्षापासून साखर कारखानदारांच्या मनमानी कारभारामुळे उत्पादक कोलमडला आहे. कारखानदारांनी अनेक शेतकर्‍यांची बिले थकविली आहेत.

सिंचन योजना व्हाव्या कार्यरत

मतदारसंघात एकीकडे कृष्णा नदीचे विपुल पाणी आहे. याचा फायदा पश्‍चिम भागाला होणे आवश्यक आहे. कृष्णा काठावर असणार्‍या गावामध्ये पूरस्थिती निर्माण होते. यामुळे पावसाळ्यात अनेक लोकांना स्थलांतर करावे लागते. या भागातील पाणी योजनेच्या माध्यमातून पश्‍चिम भागात वळविल्यास त्याचा फायदा या परिसराला होईल. तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पाणी योजनेचे उद्घाटन निवडणुकीपूर्वी केले होते. परंतु सदर योजना अद्याप सुरू झालेली नाही.

रस्त्यांची डोकेदुखी

ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याबाबतची माहिती आ.  ऐहोळे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री एच. डी.रेवण्णा यांना जि. पं. मध्ये झालेल्या बैठकीत दिली होती. विशेषत: नजीकच्या राज्यांना जोडणार्‍या रस्त्यांची समस्या गंभीर आहे. यामुळे रस्ता दुरुस्तीला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे.  मंत्री रेवण्णा यांनी रस्त्यासाठी अधिक निधी देण्याचे आश्‍वासन दिले आहे.

घरकुल योजनांची समस्या 

गरीब आणि गरजू नागरिकांना हक्‍काचे निवासस्थान उपलब्ध व्हावे, यासाठी सरकारतर्फे आवास योजना राबविण्यात येतात. मात्र यामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात शिरला आहे. यामुळे पात्र लाभार्थ्यांना डावलून भलत्याच नागरिकांना घरांचे वितरण करण्यात आले आहे. यातच अनेक घरकुले रद्द झाली आहेत. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष असून पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळायला हवा. 

चप्पल व्यवसायाला हवी ऊर्जितावस्था

रायबाग परिसरात चर्मोद्योग मोठ्या प्रमाणात चालतो. याठिकाणी तयार होणार्‍या चपलांना राज्यभरातून मागणी आहे. मात्र काही वर्षापासून व्यवसायाला घरघर लागली आहे. कच्चा माल पुरेशा प्रमाणात उपलब्ध होण्यात अडथळा येत आहे. यामुळे हा व्यवसाय दिवसेंदिवस कमी होत चालला असून लोकप्रतिनिधींनी यासाठी पुढाकार घेतल्यास ऊर्जितावस्था येऊ शकते. मात्र यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे.