Wed, Jun 26, 2019 23:43होमपेज › Belgaon › अनेकांचा जन्मदिन एक जून!

अनेकांचा जन्मदिन एक जून!

Published On: Jun 02 2018 2:00AM | Last Updated: Jun 01 2018 7:53PMबेळगाव : प्रतिनिधी

ज्यांची चाळीशी ओलांडली आहे, अशा टप्प्यातील बहुतांश लोकांचा जन्मदिवस हा 1 जून आहे. पूर्वी जन्मनोंदणीकडे फारसे लक्ष दिले जात नव्हते. अलिकडच्या काळात शासनाने प्रबोधन केल्याने जन्मनोंदणी वेळच्या वेळी होत गेली. पूर्वी नवीन विद्यार्थ्यांला प्रवेश देताना 1 जून ही जन्मतारीख नोंदणी करताना घालावी लागे. यामुळे 1 जून बहुतांश लोकांची जन्मतारीख आहे. यानिमित्ताने शुक्रवारी (दि.1) अनेकांनी आपला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. 

अनेकांचा वाढदिवस वेगवेगळ्या तारखेला असूनही त्यांना एक जूनला वाढदिवस साजरा करावा लागतो. कारण, शैक्षणिक वर्षाचा जूनमध्ये प्रारंभ होतो आणि शाळेत प्रवेश मिळतो 6 वर्षे पूर्ण झालेल्या मुलांनाच. मग पालकांची दूरदृष्टी म्हणा किंवा काही विचार न करता जन्मतारीख बदलली जाते. याचे बरेच परिणाम तारीख बदललेल्या व्यक्तीला नंतर भोगावे लागतात. काही जण वर्षातून दोन वाढदिवस साजरे करतात. खरी जन्मतारीख आणि शाळेतील दाखल्यावर असलेल्या जन्म तारखेनुसार ते साजरे करतात. एक जूनचा आपला वाढदिवस अनेकांनी अनाथाश्रमातील वृद्ध व मुलांबरोबर साजरा केला. 

एक़ जूनला अनेकांचा वाढदिवस साजरा होत असल्यामुळे याकडे कुतुहलाने पाहिले जाते. परंतु आधी इतके लोक एक़ जूनला जन्मले कसे, ही चर्चा सोशल मीडियाद्वारे रंगत आहे. जन्माला आले की त्याची सरकारदप्तरी रितसर नोंद होते. पण, स्वातंत्र्यपूर्व काळात व त्यानंतरची काही वर्षे ग्रामीण भागात अशा नोंदी अभावानेच होत असत. त्यामुळे जन्मदाखला असण्याचा अन् जन्मतारीख माहीत होण्याचा प्रश्‍नच उद्भवत नव्हता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शाळा निघाल्या. मुलांचा तपशील घेताना त्यांची खरी जन्मतारीख नोंद होऊ लागली.