होमपेज › Belgaon › मनोहर किणेकर यांचा राजीनामा

मनोहर किणेकर यांचा राजीनामा

Published On: May 21 2018 1:11AM | Last Updated: May 21 2018 12:15AMबेळगाव : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीचे पडसाद म. ए. समितीच्या गोटात उमटू लागले असून ग्रामीण मतदारसंघातून पराभूत झालेले मध्यवर्ती व बेळगाव ता. म. ए. समितीचे कार्याध्यक्ष माजी आ. मनोहर किणेकर यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा तालुका म. ए. समिती अध्यक्ष निंगोजी हुद्दार यांच्याकडे दिला. 

ता. म. ए. समितीची रविवारी ओरिएंटल स्कूलच्या सभागृहात बैठक आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी अध्यक्ष निंगोजी हुद्दार होते. यावेळी उपरोक्त निर्णय किणेकर यांनी जाहीर केला.व्यासपीठावर ज्येष्ठ कार्यकर्ते डी. बी. आंबेवाडीकर, सरचिटणीस एल. आय. पाटील, जि. पं. सदस्या माधुरी हेगडे , युवा आघाडी अध्यक्ष संतोष मंडलिक उपस्थित होते.

किणेकर यांनी राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर करताच उपस्थित कार्यकर्त्यांनी राजीनामा मंजूर करण्यात येेवू नये, असा आग्रह धरला. किणेकर यांनी आपल्या नेतृत्वाने समितीचा कारभार योग्य दिशेने हाकला आहे. परिणामी त्यांच्या नेतृत्वाची आवश्यकता असून राजीनामा स्वीकृत करू नये, अशी मागणी केली.

किणेकर म्हणाले, आजवरच्या राजकीय वाटचालीत अनेक अपशय पचविले. मात्र सामान्य कार्यकर्त्यावर विश्‍वास ठेवून आपण कार्यरत राहिलो. कोणत्याही राष्ट्रीय पक्षाची कधीच भीती वाटली नाही. मात्र, स्वकियांनी केलेला घात पचविणे अवघड आहे.2008, 2013 मध्ये माझा पराभव झाला. मात्र त्याचे दुख मला वाटले नाही. परंतु, या निवडणुकीत 80 टक्के मतदारांनी आपल्या विरोधात मतदान केले . केवळ 20 टक्के जनता आपल्या सोबत आहे. 80 टक्के जनतेला माझे नेतृत्व मान्य नसेल तर खुर्चीला चिकटून राहण्यात मला स्वारस्य नाही. मी राजीनामा दिल्यानंतर कोणत्याही इच्छुकाला संधी द्या. माझ्या राजीनाम्याने 80 टक्के जनतेचे भले होणार आहे. त्यामुळे मी राजीनामा देत आहे.राजीनामा दिलो तरी मी समितीच्या एक सच्चा सैनिक म्हणून कार्यरत राहणार आहे. याबाबत कार्यकर्त्यांनी मनात किंतू बाळगू नये.

एपीएमसी सदस्य आर. के. पाटील म्हणाले, किणेकर यांनी प्रतिकूल परिस्थितीत  समितीचे संघटन  केले . सामान्य सीमाबांधवांना त्यांचा आधार आहे. न्यायालयीन कामकाजात त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. पराभवाचे वादळ कितीही मोठे असले तरी भविष्यात पुन्हा झेप घेण्यासाठी किणेकर यांनी राजीनामा देवू नये. माजी ता. पं. सदस्य सुरेश राजुकर म्हणाले, समितीचा पराभव जिव्हारी लागणारा आहे. परकियाबरोबर स्वकियांनीदेखील घात केला असून पुन्हा या परिस्थितीतून सावरण्यासाठी किणेकरांनी पदाचा राजीनामा देवू नये.

बेकीचा संदेश पोहोचविण्यात यशस्वी

यावेळी किणेकर यांनी एकीच्या प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्याला आम्ही साथ दिली. मात्र दुसर्‍या गटाने वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारले. यातून बेकीचा संदेश जनतेत गेला. परिणामी मराठी मते राजकीय पक्षाकडे वळल्याचे सांगितले.