Tue, Feb 19, 2019 08:34होमपेज › Belgaon › मनेका यांच्या ताशेर्‍यानंतर पोलिसांकडून दक्षता

मनेका यांच्या ताशेर्‍यानंतर पोलिसांकडून दक्षता

Published On: Mar 03 2018 1:52AM | Last Updated: Mar 02 2018 11:23PMबेळगाव : प्रतिनिधी    

केंद्रीय महिला बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी पोलिस खात्याच्या कारभारावर ताशेरे ओढल्यानंतर शुक्रवारी माळमारुती पोलिसांनी कोल्ड स्टोरेज परिसरातील हालचालींवर बारीक नजर ठेवली. 

तीन स्टोरेजमधून मांसाची नियमबाह्य निर्यात केली जाते, असा आरोप करून बंगळूर प्राणीदया संघटनेचे जोशेन अ‍ॅन्टोनी यांनी तक्रार दाखल केली. माळमारुती पोलिसांनी कत्तलखान्यांवर 26 रोजी धाड टाकून मांस जप्त केलेे. ते हैदराबाद येथे तपासणीसाठी पाठविले आहे. मांसाचा पंचनामा करताना पोलिसांनी पक्षपात केल्याचा आरोप संघटना आणि भाजप  कार्यकर्त्यांनी केला होता.  

गुरुवारी मनेका गांधी यांच्या भेटीप्रसंगी पोलिस व कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. यानंतर आक्रमक भूमिका घेऊन मनेका यांनी कोल्ड स्टोरेजची पाहणी केली. तेथील कारभाराबाबत संशय व्यक्त केला. पोलिसही हबकून गेले होते. शुक्रवारी पोलिसांनी ऑटोनगरात बंदोबस्त वाढवला.

पर्यावरणवादी आणि  सामाजिक कार्यकर्त्यांची गळचेपी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे कोल्ड स्टोरेजबरोबर पोलिस अधिकार्‍यांची वरिष्ठस्तरावर चौकशी करण्यात येईल, अशी माहिती मनेका यांनी दिली.

काही दिवसांपासून कत्तलखान्यांवरून वादंग निर्माण झाले आहे. गुरुवारी मनेका गांधी यांनी कत्तलखान्यांची पाहणी केली. त्यावेळी पोलिस अधिकार्‍यांनी मनेका यांच्यासह भाजपचे खा. प्रल्हाद जोशी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते जगदीश शेट्टर यांच्या प्रश्‍नांना थेट उत्तर देण्याचे टाळले. त्यांना पाहणी करण्यापासूनही रोखण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतप्‍त मनेका यांनी पोलिस अधिकार्‍यांना धारेवर धरले. त्या म्हणाल्या, कारवाई करण्यास अथवा माहिती देण्यास अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. यामागे राजकीय दबाव आहे. कत्तलखान्यांचा कारभार आणि अधिकार्‍यांची चौकशी करण्यात येईल.

मनेका यांच्यासमवेत खा. सुरेश अंगडी, खा. प्रभाकर कोरे, आ. संजय पाटील, अभय पाटील, अ‍ॅड. अनिल बेनके, किरण जाधव, उज्ज्वला बडवाणाचे, भाजप कार्यकर्ते व प्राणीदया संघाचे सदस्य उपस्थित होते.