होमपेज › Belgaon › बेळगावकन्या मलप्रभा जाधवची ‘आशियाई’त कांस्यभरारी

बेळगावकन्या मलप्रभा जाधवची ‘आशियाई’त कांस्यभरारी

Published On: Aug 29 2018 1:41AM | Last Updated: Aug 29 2018 12:50AMजकार्ता ः प्रतिनिधी 

मुलांपेक्षा मुली कुठेही मागे नाहीत, याची प्रचिती देताना बेळगावची कन्या असलेल्या मलप्रभा जाधवने आशियाई स्पर्धेत करास अर्थात स्टँडिंग ज्युडो या क्रीडाप्रकारात देशाला पहिले पदक मिळवून देण्याचा मान मंगळवारी मिळवला. तिने कुराशमध्ये कांस्यपदक पटकावले. याच क्रीडाप्रकारात भारताला पिंकी बलालने रौप्यपदक मिळवून दिले. सुवर्णपदक मात्र भारतीयांना मिळवता आले नाही.

मलप्रभाला कांस्यपदक मिळताच तुरमुरी (ता. बेळगाव) या तिच्या मूळ गावी फटाके वाजवून आणि गावभर पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. तिच्या आई-वडिलांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या घरी रीघ लागली होती. जकार्तामध्ये मंगळवारी कुराशला प्रारंभ झाला. हा क्रीडाप्रकार यंदाच या स्पर्धेत समाविष्ट करण्यात आला आहे. भारतीय संघातून 6 महिला कुराशपटूंंनी भाग घेतला होता. 52 किलो वजनी गटात मलप्रभा जाधवने उपांत्य फेरीपर्यंत सहज मजल मारली. उपांत्य लढतीत तिची लढत उझबेकिस्तानच्या गुणाह हिच्याशी झाली. मलप्रभाने गुणाहला कडवी लढत दिली. मात्र, तिला 6-4 असा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.  तरीही सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या 

मलप्रभा जाधवची कामगिरी मोठी आहे. कारण करासमध्ये भारताला पदक मिळवून देणारी पहिली खेळाडू ठरली. याच वजनी गटात पंजाबच्या पिंकी बलालने नंतर रौप्यपदक पटकाविले. पाहुण्यांच्या हस्ते मलप्रभाला कांस्यपदक देऊन गौरविण्यात आले.

कराससाठी भारतीय संघाचा 22 दिवसांचे प्रशिक्षण शिबिरे उझबेकिस्तानमध्येच घेण्यात आले होते. जितेंद्र सिंग, सुकविंदर साहनी, सोमबीर यांनी भारतीय संघाला प्रशिक्षण दिले होते. त्याचा फायदा भारतीय करासपटूंंना झाला. 

मलप्रभाला प्रशिक्षक जितेंद्र सिंग, त्रिवेणी सिंग यांचेही मार्गदर्शन लाभले. मलप्रभाच्या यशाची बातमी बेळगावमध्ये पसरताच क्रीडाक्षेत्रातील मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले. 
गेली दहा वर्षे मलप्रभा ज्युदोचा सराव करत आहे. पूर्वी ती खो खोचा सराव करत होती. आता ज्युदोकडे वळली आहे. आमचे शेतकरी कुटुंब असून चार मुली, एक मुलगा आहे. लहानपणापासून ती जिद्दी असल्याने आज आपल्या कर्तृत्वाने तिने बेळगावसह देशाचे नाव उज्ज्वल केले आहे.     -यल्‍लाप्पा जाधव, मलप्रभाचे वडील

मुलीने मिळविलेल्या यशाने आज आमच्या घरी दिवाळी साजरी करत आहोत. तुरमुरी गावात फाटाक्याची आतषबाजी करण्यात आली. मिठाईचे वाटप करून आनंदोत्सव साजरा होत आहे. हे सर्व पाहून डोळे आनंदाश्रूने भरून आले आहेत. आपल्या मुलीचा सार्थ अभिमान आहे.      - शोभा जाधव, मलप्रभाची आई