Thu, Jun 27, 2019 02:33होमपेज › Belgaon › ‘राज्यधर्म’ की ‘बंधुप्रेम’ ठरविणार विजय

‘राज्यधर्म’ की ‘बंधुप्रेम’ ठरविणार विजय

Published On: May 08 2018 1:55AM | Last Updated: May 07 2018 9:08PMबेळगाव : प्रतिनिधी

वेगवेगळ्या राजकीय पक्षात विखुरलेल्या जारकीहोळी कुटुंबातील भाजपच्या गोटात असणार्‍या भालचंद्र जारकीहोळी यांची राजकीय कसोटी  आरभावी मतदारसंघात लागणार आहे. याठिकाणी जारकीहोळी बंधूंची भूमिका महत्त्वाची ठरणार असून ते राज्यधर्म निभावतात की बंधूप्रेमाला प्राधान्य देतात यावर विजय अवलंबून राहणार आहे. आरभावीतून काँग्रेसने अरविंद दळवाई यांना उमेदवारी दिली आहे. तर निजदच्यावतीने माहिती हक्‍क कार्यकर्ते भीमाप्पा गडाद निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

पक्षीय राजकारणाला बगल देत नेहमीच व्यक्तिकेंद्रीत राजकारणाला पसंती दिलेल्या आरभावी मतदार संघात भालचंद्र जारकीहोळी यांची कसोटी लागणार आहे.  जिल्हा काँग्रेसचे सुकाणू रमेश आणि सतिश या दोघा जारकीहोळी बंधुच्या हातात असताना भाजपच्या गोटातून भालचंद्र तिसर्‍यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. यामध्ये इतर दोघे बंधू कोणती भूमिका निभावणार याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. 

आरभावी मतदारसंघात सध्या भाजपने आघाडी घेतली आहे. भाजपतर्फे पुन्हा एकदा भालचंद्र जारकीहोळी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून मुडलगी येथे माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांची सभा घेण्यात आली आहे. यामाध्यमातून वातावरण तापले आहे. याचा लाभ भालचंद्र जारकीहोळी यांना होण्याची शक्यता आहे. सध्या या मतदार संघात भालचंद्र जारकीहोळी यांनी आपल्या विजयाची बेजमी केली आहे. मागील दहा वर्षात वेगवेगळी विकासकामे करून आपल्या मताधिक्यात वाढ केली आहे. यामुळे राज्यात काँग्रेस पक्षाची लाट असताना देखील याठिकाणी भाजपचा उमेदवार निवडून आला आहे.

काँग्रेसची खिंड अरविंद दळवाई हे लढवत आहेत. त्यांना आ. विवेक पाटील यांची कितपत साथ देतात, यावर काँग्रेसचे भवितव्य अवलंबून आहे. दळवाई यांचे या मतदारसंघात काम आहे. त्याच्या जोरावर विजय खेचून आणण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न होत आहे. त्याला बळ देण्याचे काम रमेश आणि सतिश जारकीहोळी यांना करावे लागणार आहे.  त्यामुळे आरभावी मतदार संघात कोणती भूमिका घेतात, यावर विजयाची गणिते अवलंबून राहणार आहेत. राजकीय जबाबदारीला तिलांजली देवून कौटुंबिक जबाबदारीला प्राधान्य दिल्यास याठिकाणी भाजपचा एकतर्फी विजय होण्याची शक्यता आहे.

मतदारसंघात पक्षीय राजकारणापेक्षा व्यक्तिकेंद्रीत राजकारणाचा करिष्मा चालणार आहे. त्याचबरोबर जातीची गणितेेदेखील महत्त्वाची आहेत. या मतदारसंघात धनगर समाजाची मते निर्णायक आहेत. हा मतदार वळविण्यात विधानपरिषद सदस्य विवेक पाटील यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. सध्या भाजपने प्रचारात मुसंडी मारली आहे. येथून पुढे कोणत्या प्रकारे काँग्रेस प्रचारात आघाडी घेते यावर विजयाचे गणित अवलंबून राहिले आहे. निजदचे उमेदवार भिमाप्पा गडाद हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या प्रचारासाठी कुमारस्वामी यांनी सभा घेतली आहे. त्यांच्याकडून वैयक्तिक संपर्काच्या जोरावर विजय संपादन करण्याचा प्रयत्न सुरू आहे.