Mon, May 20, 2019 10:47होमपेज › Belgaon › सीमाभागातील दूध उत्पादक अडचणीत

सीमाभागातील दूध उत्पादक अडचणीत

Published On: Jun 22 2018 2:09AM | Last Updated: Jun 21 2018 8:11PMबेळगाव : प्रतिनिधी

महाराष्ट्रातील दूध संघांनी सीमाभागातून संकलन करण्यास नकार दिल्याने उत्पादक अडचणीत सापडले आहेत. विशेषत: जर्सी गायींचे दूध नाकारण्यात येत आहेत. यामुळे उत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे.

पारंपरिक शेतीमध्ये अडकलेल्या शेतकर्‍यांना जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसायाला प्राधान्य देण्यात आले. त्यातून श्‍वेतक्रांती साकारली. दूध उत्पादन वाढले. संकरित जातीच्या जनावरांच्या नव्या वाणामुळे दूध उत्पादन  वाढले. परंतु, महाराष्ट्रातील दूध संघाच्या निर्णयांचा फटका सीमाभागातील दूध उत्पादकांना सहन करावा लागत आहे. 

मागील काही दिवसांपासून सीमाभागातून संकरित गायीचे दूध संकलन थांबविण्याचा निर्णय महाराष्ट्रातील दूध संघांनी घेतला आहे. यामुळे दूध संघाबरोबर उत्पादकही अडचणीत सापडले आहेत. अधिक उत्पादनासाठी घेण्यात आलेल्या संकरित गायी निरुपयोगी ठरत आहेत.

सीमाभागातील दूध प्रामुख्याने महाराष्ट्रातील संघांना पाठविण्यात येते. कर्नाटकच्या तुलनेत अधिक दर आणि सुविधा महाराष्ट्रातील दूध संघाकडून अधिक प्रमाणात मिळतात. परिणामी कर्नाटक दूध संघाकडे संकलन करणार्‍या दूध संघांची संख्या कमी आहे. सीमाभागातील बहुतांश दूध उत्पादक महाराष्ट्रातील दूध संघावर अवलंबून आहेत.

सध्या महाराष्ट्रात दुधाचे अतिरिक्त उत्पादन झाले आहे. दुधाबरोबर दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीवर मर्यादा आल्या आहेत. दूध भुकटीचे बाजारपेठेतील प्रति लिटरचे दर 380 रुपयावरून 150 रु. पर्यंत घसरले आहेत. यामुळे दूध संकट निर्माण झाले आहे. 

जिल्ह्यात कर्नाटक दूध उत्पादक संघ कार्यरत आहे. मात्र बेळगाव, खानापूर, चिकोडी, हुक्केरी तालुक्याच्या महाराष्ट्र सीमेलगतच्या गावांतून जिल्हा दूध संघाला अपवादाने दूध पुरवठा केला जातो. अडचणीत सापडलेल्या गावागावातील दूध संघांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी काही खासगी दूध संघ कार्यरत झाले आहेत. यामुळे दूध उत्पादकांनी सावध होण्याची गरज आहे. ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा हा व्यवसाय टिकवण्याची गरज आहे.