Thu, Mar 21, 2019 23:23
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › बंडखोरांमुळे महाराष्ट्र एकीकरण समितीला फटका

बंडखोरांमुळे महाराष्ट्र एकीकरण समितीला फटका

Published On: May 16 2018 1:39AM | Last Updated: May 16 2018 1:45AMबेळगाव : प्रतिनिधी

बंडखोरीमुळे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या तिन्ही उमेदवारांना पराभवाचा फटका बसला आहे. बेळगाव दक्षिण आणि खानापूर या दोन्ही मतदारसंघांसह बेळगाव ग्रामीण मतदारसंघातही बंडखोर उमेदवारांमुळे राष्ट्रीय पक्षांना विजय मिळवता आला आहे. या तिन्ही मतदारसंघांत मध्यवर्ती समितीच्या विरोधात बंडखोरांच्या कंपूने आपले उमेदवार उभे करून राष्ट्रीय पक्षांना मदतच केल्याचे मंगळवारी मतमोजणीनंतर सिद्ध झाले. 

निवडणूक जाहीर होण्याआधीपासूनच मध्यवर्ती समितीच्या विरोधात बंडखोर आणि त्यांचा म्होरक्या कारवाया करत होते. 2013 च्या विधानसभा निवडणुकीत मध्यवर्तीशी एकी केल्यामुळे खानापूर आणि बेळगाव दक्षिण मतदारसंघात समितीला यश मिळाले होते. यंदा त्याची पुनरावृत्ती होण्याची अपेक्षा होती. मात्र, सहा महिने आधीपासूनच बंडखोरांनी मावळते आ. अरविंद पाटील, माजी आ. मनोहर किणेकर यांच्यासह मध्यवर्तीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांच्याविरुद्ध षड्यंत्र रचण्यास प्रारंभ केला होता.

एका पराभूत झालेल्या उमेदवाराला पुन्हा उमेदवारी देऊ नये, असे निमित्त पुढे करून बंडखोरांच्या म्होरक्याने किणेकरांना विरोध केला; पण स्वतः पुन्हा किरण सायनाक या पराभूत उमेदवारालाच बेळगाव दक्षिण मतदारसंघातून समितीचे अधिकृत उमेदवार असलेल्या प्रकाश मरगाळेंच्या विरुद्ध उभे केले. खानापूरमध्येही विलास बेळगावकर या एकदा पराभूत झालेल्या उमेदवाराला अधिकृत उमेदवाराविरुद्ध लढण्यास प्रोत्साहन दिले. तर ग्रामीणमध्ये मोहन बेळगुंदकर यांना बंडखोरी करण्यास भाग पाडले.

पराभवाला बंडखोरच जबाबदार
समितीच्या या पराभवाला सर्वस्वी बंडखोर जबाबदार असल्याच्या संतप्‍त प्रतिक्रिया आता सीमाभागातून व्यक्‍त होऊ लागल्या आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीतही बंडखोरांमुळेच बेळगाव ग्रामीणमध्ये समितीला 1,300 मतांनी पराभव पत्करावा लागला होता. यंदा तर ग्रामीणसह बेळगाव दक्षिण आणि खानापूर हे हातचे मतदारसंघही गमवावे लागले.

डॉ. एन. डी. पाटील आणि पवार यांच्याकडे दुर्लक्ष

एकी करून लढा, असा सल्ला सीमालढ्यातील ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील, तसेच शरद पवार यांनी दोन महिन्यांपूर्वी दिला होता. मात्र, मध्यवर्ती समितीच बरखास्त करण्याची मागणी करून बंडखोरांनी मराठी भाषिकांत बेदिली माजवली. परिणामी, बेळगाव ग्रामीण, खानापूरमध्ये काँग्रेस, तर बेळगाव दक्षिणमध्ये भाजप विजयी ठरला.

आकड्यांचा पुरावा

समितीचा बालेकिल्ला असलेल्या खानापूर मतदारसंघातून अरविंद पाटील यांनाच मध्यवर्ती समितीने उमेदवारी दिली होती. तथापि, बंडखोरांनी त्यांच्याविरोधात विलास बेळगावकर यांना उभे केले. त्यामुळे मराठी मतांची विभागणी होऊन डॉ. अंजली निंबाळकर विजयी ठरल्या. निंबाळकर यांना 36,649 मते मिळाली आहेत. अरविंद पाटील यांनी 26,613 मते मिळविली, तर बंडखोर बेळगावकर यांनी 17,851 मते खाल्ली. या दोन्ही उमेदवारांच्या मतांची बेरीज विजयी उमेदवाच्या मतांपेक्षा 7 हजाराने जास्त आहे. बंडखोरामुळे समितीचा पराभव झाला, याचे हे नेमके उदाहरण आहे.

विरोधही जुमानला नाही
तिन्ही बंडखोरांपैकी एकही निवडून येऊ शकणार नाही, हे आधीच जाहीर होते. त्यामुळे प्रचारादरम्यान बंडखोर उमेदवारांना ठिकठिकाणी मराठी भाषिकांनी घेराव घालून माघारी धाडले. बेळगाव शहर आणि तालुक्यात तर हाताला हातही लागले. एकी करावी, अशी विनवणी शेवटपर्यंत मराठी भाषिकांनी केली; पण बंडखोरांनी हेका कायम ठेवल्याने मराठीविरुद्ध मराठी अशीच लढत होऊन समितीला पराभव पत्करावा लागला.