Tue, Jul 23, 2019 02:32होमपेज › Belgaon › दंगलखोरांना आवरा ; ड्रग्ज माफियांना शोधा

दंगलखोरांना आवरा ; ड्रग्ज माफियांना शोधा

Published On: Dec 21 2017 1:54AM | Last Updated: Dec 20 2017 11:56PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

शहरात सतत सुरू असलेल्या धार्मिक दंगलीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दंगलीला कारणीभूत समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करा. निष्पाप युवकांवर सुरू असलेली कारवाई थांबवा, अशी मागणी म.ए.समितीने प्रभारी पोलिस आयुक्त तसेच  जिल्हाधिकार्‍यांकडे आज केली. उपरोक्त मागणीचे निवेदन शहर म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे यांच्या नेतृत्वाखाली  देण्यात आले.

वारंवार घडणार्‍या दंग्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. यावर कायमची उपाययोजना करण्यासाठी दोन्ही धर्मातील समाजप्रमुखांची बैठक बोलाविण्यात यावी. असे प्रकार रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने बीट पद्धत सुरू करावी, अशीही मागणी केली. 

प्रभारी पोलिस आयुक्त रामचंद्र राव म्हणाले, गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे.  बेळगावची ख्याती शांत व जातीय सलोख्यासाठी आहे. ही ओळख कायम ठेवण्याचा प्रयत्न करू.

यावेळी माजी नगरसेवक अ‍ॅड. अमर यळ्ळूरकर, भागोजी पाटील, राजू मरवे, सूरज कणबरकर, रामचंद्र मोदगेकर व कार्यकर्ते उपस्थित होते. अशाच मागणीचे निवेदन शहर समितीनेही दिले.  दंगलीमागे ड्रग्ज माफिया सक्रिय असण्याची शक्यता असून त्यांचाही शोध घेण्यात यावा. अशा समाजकंटकांना त्वरित गजाआड करावे, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी माजी महापौर नागेश सातेरी, नगरसेवक किरण सायनाक, सरिता पाटील, नेताजी जाधव, द्वारकानाथ उरणकर, पंढरी परब, गोपाळ किल्लेकर, सुरेश किल्लेकर, रतन मासेकर, देवेंद्र दळवी, महिला आघाडीच्या रेणू किल्लेकर आदी उपस्थित होते.