होमपेज › Belgaon › जुने बेळगावात २० मार्चला मेळावा

जुने बेळगावात २० मार्चला मेळावा

Published On: Mar 11 2018 11:59PM | Last Updated: Mar 11 2018 7:50PMबेळगाव : प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यरत झाली आहे. ग्रामीण भागात तालुका म. ए. समितीतर्फे मेळावे, जागृती सभा यांना जोर  आला असताना शहरातही 20 मार्च रोजी मेळाव्याचे आयोजन केले आहे. यामुळे शहरातील कार्यकर्ते कार्यरत झाले असून जागृती मोहीम हाती घेतली आहे. मेळाव्याबाबत शहरातील मराठी भाषकांमध्ये उत्सुकता आहे.

31 मार्च रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत मध्यवर्ती म. ए. समितीने विराट मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्याचा प्रचारार्थ सीमाभागातील बेळगाव, खानापूर, निपाणी, बिदर भालकी परिसरात प्रयत्न करण्यात येत आहे. तत्पूर्वी बेळगाव दक्षिण मतदार संघातील जुने बेळगाव येथे होणारा मराठी भाषकांचा मेळावा लक्षवेधी ठरणार आहे. 

मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी कोल्हापूर जि. प. माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने उपस्थित राहणार आहेत. त्यांनी यापूर्वी बेळगुंदी, कंग्राळी येथे झालेल्या मेळाव्याना उपस्थिती दर्शवून युवकांमध्ये  जागृती निर्माण केली आहे. यामुळे त्यांच्याविषयी शहरात उत्सुकता निर्माण झाली आहे.

मेळावा वडगाव, शहापूर, जुने बेळगाव, भारतनगर आदी परिसरातील म. ए. समिती कार्यकर्त्यांच्यावतीने आयोजिण्यात आला आहे. यासाठी या भागातील आजी-माजी लोकप्रतिनिधींनी कंबर कसली आहे. 
वडगाव येथील मंगाई मंदिरापासून जागृती मोहिमेची पहिल्या दिवशी सुरुवात करण्यात आली. त्यानंतर रविवारी कपिलेश्वर मंदिर परिसरातून दुसर्‍या दिवशीची जागृती मोहीम राबविण्यात आली. यामुळे दक्षिण मतदारसंघात उत्सुकता निर्माण झाली आहे.

राजकीय पक्षांनी सध्या निवडणूकपूर्व प्रचार संपविलेला आहे. मात्र शहरातील म. ए. समितीने कोणत्याही प्रकारची जागृती मोहीम हाती घेतली नव्हती. यामुळे मराठी भाषकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. परिणामी हा मेळावा जाहीर झाल्यामुळे शहरातील मराठी भाषिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

मेळावा यशस्वी करण्यासाठी उपमहापौर मधुश्री पुजारी, माजी एपीएमसी सदस्य मनोहर होसूरकर, माजी महापौर आप्पासाहेब पुजारी, नगरसेवक रतन मासेकर, मनोहर हलगेकर, एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, राजु मरवे, शिवराज पाटील, देविदास चव्हाण-पाटील व भागातील कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत.

शहरात प्रथमच

म. ए. समितीकडून बेळगाव दक्षिणमध्ये आयोजित केलेला मेळावा शहरातील पहिलाच आहे. जानेवारीपासून ग्रामीण भागात मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. यामुळे तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. मेळाव्याकडे मराठी जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.