Fri, Jul 19, 2019 01:45होमपेज › Belgaon › मेळाव्यातून उमटणार युवा हुंकार

मेळाव्यातून उमटणार युवा हुंकार

Published On: Jan 11 2018 1:05AM | Last Updated: Jan 10 2018 8:18PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

तालुका म. ए. समितीने बेनकनहळ्ळी येथे शुक्रवार दि. 12 रोजी  स. 11 वा. युवा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याची उत्सुकता तालुक्यात निर्माण झाली असून यामध्ये शेकडोंच्या संख्येने युवा व महिला सहभागी होणार आहेत. तालुक्यातील युवाशक्ती एकवटणार आहे. मेळाव्याला खंडू डोईफोडे (बार्शी) व दिनेश ओऊळकर हे मार्गदर्शन करणार आहेत.

युवा आघाडीच्या माध्यमातून मागील काही वर्षापासून युवादिनी मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षीदेखील बेनकनहळ्ळी मेळावा आयोजित केला असून यावेळी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात येणार आहे. यामुळे तालुक्यातील युवकांबरोबर महिलादेखील मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

युवा मेळाव्यात शिवचरित्रावर खंडू डोईफोडे यांचे व्याख्यान होणार आहे. डोईफोडे यांच्या फर्ड्या वक्तृत्वाची सध्या सीमाभागात जोरात सुरू असून त्यांच्या तोंडून शिवचरित्र ऐकण्याची संधी युवकांना मिळणार आहे. राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर लता पावशे मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्र सरकारच्या सहकार खात्याचे निवृत्त निबंधक व महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नाच्या सीमाकक्षाचे अधिकारी दिनेश ओऊळकर हे सीमाप्रश्‍नाबाबत युवकांना संबोधित करणार आहेत.

मेळाव्याची म. ए. समितीकडून जोरात तयारी करण्यात आली आहे. युवा आघाडी व इतर नेत्यांच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक गावांमध्ये जागृती मोहीम राबविली आहे. मेळाव्यामध्ये अधिकाधिक युवकांनी सहभागी व्हावे, यासाठी प्रयत्न चालविले आहेत. मेळाव्याला किमान पाच हजार युवक व महिलांची उपस्थिती राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. यासाठी सुमारे तीन जागृती पथकाच्यावतीने तालुक्यात युवकांमध्ये प्रबोधन केले आहे. 

मेळाव्यातून निर्माण होणार चैतन्य

बेळगाव : प्रतिनिधी

युवकांना संघटित करून त्यांच्यामध्ये शिवचरित्र आणि सीमाप्रश्‍नी जागृती करण्यात येणार आहे. यातून युवक आणि महिलांमध्ये जागृती निर्माण होणार आहे. यासाठी तालुक्यातील युवकांनी मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ता. म. ए. समितीचे कार्याध्यक्ष माजी आ. मनोहर किणेकर यांनी केले.

युवा आघाडीच्यावतीने शुक्रवारी युवा मेळाव्याचे आयोजन केले आहे.सदर मेळाव्यासाठी बेनकन्नहळ्ळी येथे मंडप उभारण्याचा प्रारंभ बुधवारी करण्यात आला. ग्रा. पं. अध्यक्षा रेहाना बेळगावकर यांच्याहस्ते मुहूर्तमेढ रोपण करण्यात आले. यावेळी माजी आ. किणेकर बोलत होते. किणेकर म्हणाले, शिवचरित्रातून मराठी माणसाला लढण्याची प्रेरणा मिळते. प्रतिकूल परिस्थितीत झुंज देण्याचे बळ प्राप्त होते. त्यामुळे त्यांच्या इतिहासाचा जागर मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. 

सीमाप्रश्‍न न्यायालयात असून महत्त्वपूर्ण टप्प्यावर आहे. त्याची माहिती युवकांना मेळाव्यातून करून देण्यात येणार आहे. यासाठी सीमाकक्षाचे अधिकारी म्हणून कार्यरत असणारे दिनेश ओऊळकर मार्गदर्शन करणार आहेत.

ग्रा. पं. सदस्य कल्लाप्पा देसूरकर म्हणाले, बेनकन्नहळ्ळीमध्ये पहिल्यांदाच या प्रकारचा मेळावा होत आहे. हा गावचा सन्मान आहे. मेळाव्यातून मराठी माणसाला बळ मिळणार असून समस्त ग्रामस्थांनी मेळाव्यात सहभागी व्हावेे.

यावेळी युवा आघाडी अध्यक्ष अ‍ॅड. शाम पाटील, उपाध्यक्ष दत्ता उघाडे, संतोष मंडलिक, राजू किणेकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला ता. पं. सदस्या रंजना कोलकार, ग्रा. पं. सदस्य लक्ष्मण पाटील, चंदा पाटील, शांता खांडेकर, अचल हाजगोळकर, देवाक्‍का कांबळे, माजी ता. पं. सदस्या तुळसा पाटील, उमेश पाटील, मारुती पाटील, बाबाजी देसूरकर, चंद्रकांत पाटील, अनंत पाटील, युवराज पाटील, मोनाप्पा पाटील, सागर सावगावकर, रमेश मंडलिक, प्रविण मंडलिक, किसन देसूरकर, प्रसाद देसूरकर, किरण मोटणकर, निंगाप्पा मोरे, कलाप्पा घाटेगस्ती, संजय अष्टेकर, लक्ष्मण पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन ग्रा. पं. सदस्य बसवंत घाटेगस्ती यांनी केले. रामा पाटील यांनी आभार मानले.

हंगरगा, मंडोळीतून पाठिंबा

बेळगाव : प्रतिनिधी

मंडोळी, हंगरगा, सावगाव परिसर हा मराठी भाषिकांचा बालेकिल्ला आहे. समितीच्या प्रत्येक लढ्यात या भागाचा लक्षणीय सहभाग नेहमीच असतो. युवा मेळाव्यातदेखील या भागातून हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचा निर्धार माजी ता. पं. सदस्य कृष्णा हुंदरे यांनी व्यक्त केला.

शुक्रवारी होणार्‍या युवा मेळाव्याच्या जागृतीसाठी मंडोळी परिसरात माजी आ. मनोहर किणेकर यांच्या उपस्थितीत जागृती बैठकी घेण्यात आल्या. यावेळी ग्रामस्थांनी मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार केला.

हंगरगा येथे झालेल्या बैठकीत माजी ता. पं. सदस्य कृष्णा हुंदरे यांनी मेळाव्यामध्ये हंगरगा येथून कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी जि. पं. सदस्य दिलीप कांबळे, कृष्णा पाटील आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

मंडोळी येथे ज्येष्ठ कार्यकर्ते धाकलू आंबेवाडीकर यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी मंडोळी गावातून युवा कार्यकर्त्यांनी मेळाव्याला पाठिंबा व्यक्त केला. यावेळी माजी ता. पं. सदस्य यल्लाप्पा कणबरकर, सचिन दळवी, केदारी कणबरकर, अनंत पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

सावगाव येथे कल्लाप्पा घाटेगस्ती यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी माजी जि. पं. सदस्या प्रेमा मोरे यांनी मेळाव्यात महिला कार्यकर्त्यादेखील उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली. यावेळी ता. पं. सदस्या नीरा काकतकर, निंगाप्पा मोरे, बसवंत घाटेगस्ती, सागर सावगावकर, निवास भातकांडे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

सीमाप्रश्‍नी, युवकांनो संघटित व्हा

बेळगाव : प्रतिनिधी

सीमाभागातील मराठी युवकांना नोकरी, व्यवसायात केवळ ते मराठी  भाषिक असल्यामुळे डावलण्यात येते. मराठीतून कागदपत्रे देण्यात येत नाहीत. कानडीचा वरंवटा फिरविला जातो. याबाबत आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षांकडून आवाज उठविला गेला नाही. त्यांना मराठी युवक केवळ निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक आहेत. यामुळे मराठी युवकांनी सावध होण्याची गरज असून संघटित होण्याची आवश्यकता असल्याचे मत युवा आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. शाम पाटील यांनी व्यक्त केले.

तालुका म. ए. समिती युवा आघाडीच्यावतीने शुक्रवार दि. 12 रोजी आयोजित युवा मेळावा जागृती फेरी मंगळवारी सायंकाळी आंबेवाडी येथे काढण्यात आली. त्यावेळी अ‍ॅड. शाम पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी ग्रा. पं. उपाध्यक्ष अनंत तुडयेकर होते.

अ‍ॅड. पाटील म्हणाले, आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षांनी सीमाबांधवांना न्याय देण्याचे काम केले नाही. सीमाप्रश्‍न प्रलंबित ठेवून मराठी भाषिकांवर अत्याचार केला आहे. यातून मराठी भाषा, परंपरा अडचणीत आली आहे. यासाठी मराठी युवकांनी कोणत्याही राजकीय पक्षाच्या भूलथापांना बळी न पडता, सीमाप्रश्‍नी एकत्रित येण्याची गरज आहे. 

माजी मुख्याध्यापक पी. के. तरळे म्हणाले, कोणताही लढा हा युवकांच्या भक्‍कम अशा सहभागावर अवलंबून असतो. त्याची धार युवकांच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असते. यामुळे मराठी युवकांनी आपली मातृभाषा व संस्कृतीशी द्रोह न करता मेळावा यशस्वी करावा. मेळाव्यात शिवचरित्र व सीमाप्रश्‍नी माहिती देण्यात येणार असून त्याचा लाभ युवकांना होणार आहे.

माजी ता. पं. सदस्य शिवाजी राक्षे म्हणाले, आंबेवाडी परिसर हा नेहमीच सीमाप्रश्‍नाच्या लढ्यात नेहमीच अग्रेसर राहिला आहे. यामुळे युवा मेळाव्यासाठी या भागातून अधिकाधिक युवक व कार्यकर्ते सहभागी होतील.

यावेळी माजी ता. पं. सदस्या कमल मन्नोळकर म्हणाल्या, युवा मेळाव्यादिवशीच राजमाता जिजाऊ यांची जयंती असून या मेळाव्यात महिलादेखील मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.  मराठीच्या लढ्यात महिलादेखील अग्रेसर राहणार आहेत.  माजी ग्रा. पं. अध्यक्ष शंकर तरळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रत्नप्रसाद पवार, रवी तरळे, रामचंद्र कुद्रेमानीकर, तुकाराम फडके आदीसह आंबेवाडी ग्रामस्थ व युवा आघाडीचे कार्यकर्ते बैठकीला  उपस्थित होते.