Mon, May 20, 2019 20:04होमपेज › Belgaon › बंडखोरांना शहापुरी हिसका

बंडखोरांना शहापुरी हिसका

Published On: Apr 30 2018 1:42AM | Last Updated: Apr 30 2018 12:01AMबेळगाव : प्रतिनिधी

मध्यवर्ती म. ए. समितीने प्रकाश मरगाळे यांना अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केलेले असताना, बंडखोर उमेदवारांनी प्रचारालाच येऊ नये, अशी भूमिका घेत शहापुरातील मराठीप्रेमींनी रविवारी बंडखोरांना माघारी धाडले. त्यामुळे बंडखोर उमेदवार किरण सायनाक आणि त्यांच्या समर्थकांना प्रचाराविना परत जावे लागले. कोरे गल्लीत हा प्रकार घडला.

मध्यवर्ती समितीचे अधिकृत उमेदवार प्रकाश मरगाळे आहेत. तथापि, सायनाकच अधिकृत उमेदवार आहोत, असा प्रचार सायनाक आणि त्यांचे समर्थक करत होते. त्याला कोरे गल्लीतील पंचांनी आक्षेप घेतला. 

मध्यवर्तीचे उमेदवार मरगाळे आहेत, हे आम्ही जाणतो. मग तुम्ही एकी करण्याऐवजी स्वतःच उमेदवारी का जाहीर केली, असा जाब पंचांनी सायनाक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारला. तसेच याआधीच आम्ही मरगाळेंच्या पाठीशी असल्याचे जाहीर केलेय. त्यामुळे तुम्ही आधी एकी करा, मगच आमच्या परिसरात प्रचाराला या, असे सायनाक यांना स्पष्टपणे सांगितले.

पंचांच्या प्रश्‍नांना सायनाक यांना उत्तरे देता आले नाही. त्यामुळे त्यांना काढता पाय घ्यावा लागला. कोरे गल्लीतील गंगापुरीमठाजवळ सायनाक प्रचार आले असता, हा प्रकार घडला.  तत्पूर्वी, कोरे गल्ली मंडळाने अधिकृत उमेदवाराच्या पाठीशी राहण्याचा निर्णय फलकाद्वारे जाहीर केला होता.

मध्यवर्ती समितीने उमेदवार जाहीर केल्यानंतर बंडखोर गटाने उमेदवार जाहीर केल्यामुळे बर्‍याच भागांत संभ्रमावस्था आहे. तथापि, मध्यवर्ती समितीच्या निष्ठावंतांनी अधिकृत उमेदवार मरगाळे यांनाच पाठिंबा दिला आहे. तर काही मंडळांनी एकी केल्याशिवाय आपल्या भागात प्रचाराला येऊ नका, असे आवाहन केले आहे. रविवारीही तोच प्रकार घडला. काही भागांत तर एकी झाल्याशिवाय प्रचाराला आलात तर मतदानावर बहिष्कार घालू, असा इशाराही देण्यात आला आहे. मध्यवर्ती समितीच्या छत्राखाली एकत्र येत नाही, तोपर्यंत प्रभागात फिरू देणार नाही, असाही इशारा काही मंडळांनी दिला आहे.