होमपेज › Belgaon › बंडखोरांचा निषेध

बंडखोरांचा निषेध

Published On: Jun 01 2018 1:43AM | Last Updated: Jun 01 2018 12:38AMबेळगाव : प्रतिनिधी

ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत मराठी मतदारांना संभ्रमात टाकण्यासाठी मध्यवर्ती समिती बरखास्त झाल्याचा खोटा प्रचार करणारे बंडखोर आणि त्यांचे म्होरके किरण ठाकुर यांचा गुरुवारी मध्यवर्ती म. ए. समिती बैठकीत निषेध करण्यात आला.मराठा मंदिरात गुरुवारी ही बैठक झाली. अध्यक्षस्थानी दीपक दळवी होते.

मध्यवर्ती म. ए. समितीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करून बरखास्तीची मागणी करणारे किरण गावडे, माजी आ. दिगंबर पाटील, मनोज पावशे, म्हात्रू झंगरूचे यांच्यासह किरण ठाकूर यांचा बैठकीत निषेध करण्यात आला. 
विधानसभा निवडणुकीनंतर गुरुवारी प्रथमच मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते. यामुळे मराठी भाषिकांचे लक्ष बैठकीकडे लागून राहिले होते.

दीपक दळवी म्हणाले, मध्यवर्ती बरखास्त करण्याचा अधिकार कोणालाही नाही. ज्यांचा समितीशी दुरान्वयेही संबंध नाही, त्यांनी वल्गना करण्याचा प्रयत्न करू नये. अशा प्रयत्नांना मराठी जनता भीक घालणार नाही. प्रकाश मरगाळे म्हणाले, म. ए. समिती ही कोणाचीही खासगी मालमत्ता नाही. बंडखोरांनी स्वत: जिंकण्यापेक्षा समितीच्या उमेदवारांना पाडण्यातच धन्यता मानली. 

माजी आ. अरविंद पाटील म्हणाले, खानापूर म. ए. समितीत कुरबुरी सुरू होत्या. राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांना मदत करण्यासाठी बंडखोरांनी अर्थपूर्णव्यवहारातून प्रयत्न केले आहेत. सरचिटणीस मालोजी अष्टेकर,  रणजित चव्हाण-पाटील, नानू पाटील, गोपाळ पाटील, विकास कलघटगी, राजू मरवे आदी उपस्थित होते.

घटक समितीतून 9 सदस्य

बैठकीत पराभवाबाबत चर्चा करण्यात आली. पराभवाचे सावट सीमाप्रश्नाच्या लढ्यावर कोणत्याही प्रकारे पडता कामा नये, यासाठी पुन्हा एकदा नेटाने कामाला लागण्याचा निर्धार करण्यात आला. त्याचबरोबर मध्यवर्ती म. ए. समितीवर प्रत्येक मतदारसंघातून नऊ सदस्य घटक समितीने सूचविण्याचा ठराव करण्यात आला.