Thu, Jul 18, 2019 02:05होमपेज › Belgaon › ‘एक मराठा, लाख मराठा’चा विसर

‘एक मराठा, लाख मराठा’चा विसर

Published On: May 04 2018 1:53AM | Last Updated: May 04 2018 12:37AMबेळगाव : प्रतिनिधी

आरक्षणासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रासह विविध भागात ऐतिहासिक मराठा मूक क्रांती मोर्चा काढण्यात आले. कर्नाटक, गोवा व इतर राज्यातील मराठा बांधवांनी ठिकठिकाणी मूक मोर्चे काढून राज्य सरकारना चांगलाच हादरा दिला होता. ‘एक मराठा लाख मराठा’ हे या मोर्चांचे ब्रिदवाक्य होते. त्या मोर्चाद्वारे समग्र मराठा समाज भगव्या ध्वजाखाली एकत्र आला होता. मात्र निवडणूक काळात म. ए. समितीमधील शुक्राचार्यांना एक मराठा, लाख मराठा या घोषणेचा विसर पडला आहे.

बेळगाव शहरामध्ये 16 फेब्रुवारी 2017 रोजी मराठी मूक क्रांती मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये मराठा समाजातील पुरुष, महिला, तरुण, तरुणी लाखोंच्या संख्येने एकत्र आलेले पाहून बेळगाव शहरातीलच नव्हे तर कर्नाटक राज्यातील राजकारण हादरले होते. क्रांती मोर्चासारखे विधानसभा, लोकसभा निवडणुकीमध्ये हा मराठा समाज एकत्र आला तर आमचे काय होणार, या चिंतेने राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांना ग्रासले होते. सध्या कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले असून मराठा समाज गट-तटात विखुरला गेला आहे.

म. ए. समितीने गट-तट विसरून सीमाप्रश्‍नासाठी प्रत्येक मतदार संघात एकच उमेदवार उभा करून निवडून आणण्याचे आवाहन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, सीमालढ्यातील अग्रणी प्रा. एन. डी. पाटील यांच्या बेळगावातील जाहीर सभेद्वारे करण्यात आले होते. घटक समित्यांनी उमेदवाराची शिफारस केल्यानंतर मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने प्रा. एन. डी. पाटील उमेदवाराची निवड करणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु त्या निर्णयाला सुरुंग लावण्याचे काम काही नेत्यांनी केले. त्यामुळे एकीच्या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण झाला. 

मध्यवर्ती म. ए. समितीने बेळगाव ग्रामीणमध्ये मनोहर किणेकर, बेळगाव दक्षिणमधून प्रकाश मरगाळे तर खानापूरमधून आ. अरविंद पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. या निर्णयाला आव्हान देऊन खानापूरमधून विलास बेळगावकर,  बेळगाव ग्रामीणमध्ये मोहन बेळगुंदकर, बेळगाव दक्षिणमध्ये किरण सायनाक यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून बंडखोरांचा प्रचारही सुरू आहे. त्यामुळे मराठी मतदारांमध्ये  गोंधळ निर्माण झाला आहे.