होमपेज › Belgaon › ता. म. ए. समितीमध्ये शिथिलता : पुन्हा सक्रिय होण्याची गरज

निवडणुकानंतर साप्ताहिक बैठक ठप्प

Published On: Jun 16 2018 1:28AM | Last Updated: Jun 15 2018 8:29PMबेळगाव : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीत सामोरे जावे लागलेल्या पराभवामुळे तालुका म. ए. समितीमध्ये नैराश्य निर्माण झाले आहे. परिणामी  प्रत्येक आठवड्याला शनिवारी तालुका म. ए. समितीतर्फे घेण्यात येणारी साप्ताहिक बैठक महिनाभरापासून ठप्प झाली आहे.यामुळे कार्यकर्त्यांना अडचण निर्माण झाली असून कार्यकर्त्यांनी पुन्हा साप्ताहिक बैठक घ्यावी, अशी मागणी होत आहे.

तालुका म. ए. समिती पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये समन्वय राहावा, यासाठी माजी आ. मनोहर किणेकर यांनी कॉलेज रोडवरील कार्यालयात साप्ताहिक बैठकीची प्रथा सुरू केली. बैठकीत पदाधिकार्‍यांकडून लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करण्यात येत असे. त्याचबरोबर तालुक्यातील विविध गावांना भेडसावणार्‍या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आंदोलनाची दिशा ठरविण्यात येत असे. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत म. ए. समितीला पराभवाला सामोरे जावे लागले, परिणामी साप्ताहिक बैठकी ठप्प झाल्या आहेत. 

साप्ताहिक बैठकीमध्ये प्रामुख्याने अध्यक्ष, कार्याध्यक्ष, पदाधिकारी, जि. पं., ता. पं., व ए. पी. एम. सी. सदस्य सहभागी होत असत. नागरिकांना भेडसावणार्‍या समस्याबाबत लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन ज्येष्ठांकडून करण्यात येत असे. ता. पं. अथवा जि. पं. ची सर्वसाधारण बैठक असल्यास बैठकीत मांडावयाचे विषय ठरविण्यात येत असत. यामुळे सदस्यांना सभागृहात आक्रमकपणे विषय मांडणी होणे शक्य होत असे. मात्र साप्ताहिक बैठक ठप्प झाल्याने लोकप्रतिनिधीमध्ये समन्वय ठेवणे अवघड बनले आहे. नागरिकांच्या प्रश्‍नावर सभागृहात आवाज उठविताना म. ए. समितीच्या सदस्यांमध्ये समन्वयाचा  अभाव आढळून येतो. यामुळे साप्ताहिक बैठक पूर्वीप्रमाणे सुरू ठेवावी, अशी मागणी करण्यात येत आहे. सध्या ता. म. ए. समितीचे कार्याध्यक्ष माजी आ. मनोहर किणेकर यांनी राजीनामा दिला आहे. याचाही फटका बसला आहे. यावर मात करण्यासाठी पुन्हा एकदा किणेकर यांना संघटनेत सक्रिय करावे लागणार आहे. त्याचबरोबर लोकप्रतिनिधींच्या समन्वयासाठी साप्ताहिक बैठक होणे आवश्यक असल्याचे मत कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.

समस्यांविरुद्ध हवा आवाज

सध्या खरीप हंगामातील पेरणी सुरू आहे. यामुळे शेतकरी पेरणीच्या कामात मग्न आहेत. मात्र प्रशासनाच्या मुजोरपणामुळे नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. बियाणांचा पुरवठा, शेतातील मोटारींना सुरळीत वीजपुरवठा, तालुक्यातील रस्त्यांची दुर्दशा यासारख्या सामान्यांना भेडसावणार्‍या समस्यावर आवाज उठविण्याचे काम ता. म. ए. समितीला करावे लागणार आहे. यासाठी समितीने नैराश्य झटकून पुन्हा एकदा उभे राहण्याची मागणी होत आहे.