Mon, Apr 22, 2019 16:30होमपेज › Belgaon › म. ए. समितीमध्ये एकीसाठी गल्‍लोगल्‍लीमधील फलक झाले बोलके

म. ए. समितीमध्ये एकीसाठी गल्‍लोगल्‍लीमधील फलक झाले बोलके

Published On: May 01 2018 1:15AM | Last Updated: Apr 30 2018 10:58PMबेळगाव : प्रतिनिधी

म. ए. समितीमध्ये एकी व्हावी. बेळगावसह ग्रामीण व खानापूर तालुक्यात म. ए. समितीचा एकच उमेदवार निवडणूका रिंगणात राहावा, अशी मराठी भाषिकांची मागणी होती. त्यासाठी एकाच छताखाली या.  एकच उमेदवार द्या. यासाठी काहीजणांनी प्रयत्न केले. मात्र त्यांच्या प्रयत्नाला यश आले नाही. शहरातील विविध भागात गल्लोगल्लीमधील मंडळांच्या फलकावर मजकूर लिहून विधानसभा निवडणुकीत आपली भूमिका स्पष्ट करत आहेत. त्याचे फोटो सोशल मीडियावर वेगाने फिरत आहेत.

31 मार्च रोजी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, प्रा. एन. डी. पाटील यांच्या सभेला बेळगाव दक्षिण, उत्तर व ग्रामीण मतदार संघातील दिग्गज नेतेमंडळी व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यंदाच्या निवडणूकीत सीमाभागात म. ए. समितीमध्ये एकीचे वारे वाहू लागले होते.  याची धास्ती राष्ट्रीय पक्षानीदेखील घेतली होती. मात्र त्यानंतर उमेदवारी निवडीवरुन म. ए. समितीमध्ये पूर्वीप्रमाणेच दोन गट तयार झाले. निवडणूक रिंगणात मराठी भाषिक दोन उमेदवार उभे राहिल्यामुळे सीमाभागात तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी मराठी मतदारांनी मंडळांच्या फलकाचा आधार घेतला आहे. त्यावर आपल्या वॉर्डातील पाठिंबा कोणाला, एकी झाली नाही तर प्रवेश नाही, एकी करत नसाल तर आमच्या वॉर्डात प्रचाराला फिरकू नका, अशा प्रकारचा मजकूर लिहिलेले फलक गल्लोगल्ली पाहावयास मिळत आहेत. 

माघार घेण्यासाठी व एका मतदार संघात एकच समितीचा उमेदवार राहावा, यासाठी कै. सुरेश हुंदरे स्मृतिमंच व पाईक, वॉर्डातील ज्येष्ठ पंचमंडळीनी प्रयत्न केले. मात्र यश आले नाही. प्रत्येकजण आपल्याच मतावर ठाम असल्याने पुन्हा ये रे माझ्या मागल्या... अशी परिस्थिती आहे.  खानापुरात देखील आजी, माजी आमदारांनी आपापले उमेदवार निवडणूक रिंगणात उभे केले आहेत. 

दोन्ही गटातून स्वतंत्र उमेदवार

यंदाच्या निवडणूकीत म. ए. समितीचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आणा. सीमाप्रश्‍न न्यायालयात आहे. त्यासाठी रस्त्यावरची लढाई थांबवून चालणार नाही. उमेदवार निवडीचे सर्वाधिकार प्रा. एन. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व्हावेत, अशा सूचना  शरद पवार यांनी दिल्या होत्या. मात्र दोन्ही गटातील समितीच्या नेत्यांनी आपापले स्वतंत्र अर्ज दाखल केले.