होमपेज › Belgaon › म. ए. समिती बैठकीत कार्यकर्त्यांच्या भावनांचा उद्रेक 

बेळगावात म. ए. समितीचा पराभव स्वकीयांमुळे 

Published On: May 21 2018 1:11AM | Last Updated: May 21 2018 1:11AMबेळगाव : प्रतिनिधी

सीमाभागात म. ए. समितीचा पराभव स्वकीयांमुळेच झाल्याची टीका करत युवा कार्यकर्त्यांनी या अस्तनीतल्या निखार्‍यांना बाजूला करण्याची हाक दिली आहे. धनशक्‍ती आणि स्वकीयांच्या विश्‍वासघातामुळे समिती उमेदवाराचा पराभव झाल्याचा आरोप करताना कार्यकर्त्यांच्या भावनांचा उद्रेक झाला.

निवडणूक निकालानंतर प्रथमच म. ए. समितीची बैठक रविवारी झाली. अध्यक्षस्थानी अध्यक्ष निंगोजी हुद्दार होते. यावेळी कार्यकर्त्यांनी पराभवाची कारणमीमांसा करताना राष्ट्रीय पक्षाच्या धनशक्‍तीबरोबरच स्वकीयांच्या विश्‍वासघातावर ताशेरे ओढले. यामुळे वातावरण तंग बनले होते.

सरचिटणीस एल. आय. पाटील म्हणाले, लढ्याचा भाग म्हणून समिती  विधानसभा निवडणूक लढवत असते. यापूर्वी समितीने अनेक पराभव स्वीकारले आहेत. मात्र, यावेळचा पराभव खूप वेदनादायक आहे.
बी. डी. मोहनगेकर म्हणाले, अर्थकारणामुळे समिती उमेदवाराचा पराभव झाला. राजकीय पक्षाच्या आमिषाला मराठी माणूस बळी पडला. स्वाभिमान गहाण ठेवण्यात आला.

अ‍ॅड. सुधीर चव्हाण म्हणाले, समितीचा पराभव म्हणजे कुंपणानेच शेत खाल्ल्यासारखे आहे. आपल्यातील काहींनी विश्‍वासघात केला. त्यांना वेळीच ओळखणे आवश्यक होते. पराभवाने खचून न जाता सीमाप्रश्‍न सुटेपर्यंत आम्ही लढत राहू. अनंत तुडयेकर (आंबेवाडी) म्हणाले, निवडणुकीत युवकांचे योगदान अधिक आहे. त्यांनी प्रामाणिकपणे काम केले. म्हणूनच अतिशय प्रतिकूल परिस्थितीतदेखील आंबेवाडी, मंडोळी, सावगावातून समितीला अधिक मताधिक्य मिळाले. श्रीकांत मांडेकर, बी. एस. पाटील, रवी तरळे, एम. आय. पाटील, अ‍ॅड एम. जी. पाटील यांनी सूचना मांडल्या.

शिवाजी खांडेकरांचा इशारा

समिती उमेदवाराचा झालेला पराभव अनेक कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला. यामुळे व्यथित झालेल्या तुरमुरी येथील शिवाजी खांडेकर यांनी आसनावर बसण्यास नकार दिला. त्यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून जमिनीवर ठाण मांडले. यापुढे कोणत्याही नेत्याने दुसर्‍यांदा निवडणूक लढवू नये, अशी मागणी त्यांनी केली. किणेकरांनी राजीनामा दिल्यास बेळगाव ग्रामीणची स्थिती निपाणीसारखी होईल, असा इशाराही दिला.

मोदगेकर धारेवर

माजी जि. पं. सदस्य रामचंद्र मोदगेकर यांनी समितीच्या पराभवाबद्दल युवकांना कारणीभूत ठरविण्याचा प्रयत्न केला. समितीमध्ये युवकांची संख्या कमी आहे. यामुळे पराभव झाल्याचे सांगितले. परिणामी बैठकीतील काही युवा कार्यकर्त्यांनी याला आक्षेप घेतला. प्रचाराच्या दरम्यान सर्वाधिक युवा कार्यकर्ते कार्यरत होते. त्यांच्यामुळेच समितीला किमान 23 हजार मतांपर्यंत पोहोचता आल्याचे सांगितले.