होमपेज › Belgaon › येळ्ळूरमध्ये महाराष्ट्र दिन

येळ्ळूरमध्ये महाराष्ट्र दिन

Published On: May 02 2018 1:18AM | Last Updated: May 02 2018 1:18AMबेळगाव : प्रतिनिधी

मराठी भाषेचा स्वाभिमान नसा-नसात बाळगणार्‍या आणि प्रसंगी लाठ्या-काठ्या झेलणार्‍या मराठमोळ्या येळ्ळूरमध्ये मंगळवारी महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. बंडखोर उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घ्यावी, अशीही मागणी यावेळी येळ्ळूर विभाग म. ए. समितीने केली. 

महाराष्ट्र दिनी येळ्ळूर विभाग म. ए. समितीने गावातून फेरी काढून म. ए. समिती उमेदवारांच्या एकीची मागणी केली. 

बंडखोरांनी अधिकृत उमेदवाराविरोधात बंडाचा झेंडा फडकावल्यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याचे पडसाद ठिकठिकाणी पडत असून, एकीची मागणी लावून धरण्यात येत आहे.

यावेळी माजी जि.पं. सदस्य अर्जुन गोरल म्हणाले, येळ्ळूर गावाने आजपर्यंत मराठी स्वाभिमान जपला आहे. त्यांनी केलेला त्याग अपूर्व असून, म. ए. समितीचा अधिकृत उमेदवार विजयी व्हावा, ही इच्छा आहे. मात्र, सध्या किरण सायनाक, मोहन बेळगुंदकर व विलास बेळगावकर यांनी अधिकृत उमेदवारांविरोधात अर्ज दाखल केला आहे. यामुळे मराठी मतांचे विभाजन होण्याचा धोका आहे. 
बंडखोरांना माघार घेण्यासाठी पत्रक देण्याचा निर्णय घेण्यात आला. शरद पवार यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रा. एन. डी. पाटील यांच्याशी चर्चा करून मध्यवर्ती म. ए. समितीने अधिकृत उमेदवार जाहीर केलेले आहेत. त्यांच्या विजयासाठी अन्य मराठी उमेदवारांनी माघार घेण्याची मागणी करण्यात आली. 

ता.पं. सदस्य रावजी पाटील, ग्रा.पं. अध्यक्षा अनुसया परीट, सदस्य वामन पाटील, सरचिटणीस एल. आय. पाटील, एपीएमसी सदस्य महेश जुवेकर आदींसह कार्यकर्ते फेरीत सहभागी झाले होते.