Sun, Mar 24, 2019 06:13होमपेज › Belgaon › संमेलनातून भाषा, संस्कृतीचा जागर : हलगेकर

संमेलनातून भाषा, संस्कृतीचा जागर : हलगेकर

Published On: Jan 01 2018 1:54AM | Last Updated: Dec 31 2017 10:43PM

बुकमार्क करा
खानापूर : प्रतिनिधी

संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषा व संस्कृतीचा जागर घालण्याचे कार्य सुब्रम्हण्य अकादमीने वीस वर्षापासून नेटाने चालविले आहे. मराठीचा हा जागर अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर यांनी केले. 21 संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

आ. अरविंद पाटील यांनी सुसंस्कृत आणि चारित्र्यसंपन्न पिढी घडविण्याच्या कार्यात संमेलनांचा व पुस्तकांचा वाटा महत्त्वाचा असल्याचे  सांगितले. धनश्री सरदेसाई यांनी महिलांच्या समानतेसाठी सामाजिक जाणिवेचा अभाव असल्याचे सांगून स्त्रीयांनी कर्तृत्वाची शिखरे पादाक्रांत करण्याचे आवाहन केले. बालभवन मंडळाच्या अध्यक्षा डॉ. अंजली निंबाळकर म्हणाल्या, समाजातील चांगल्या विचारांचा जागर संमेलनांमुळे घडून येत असून भाषेबरोबरच विकासाचाही विचार करण्याची वेळ आली आहे.

संमेलनात गुणवंत विद्यार्थी, शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. वास्तुविशारद पीटर डिसोजा यांनी  स्वागत केले. अकादमीचे अध्यक्ष बाबुराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. आ. अरविंद पाटील, विठ्ठल हलगेकर, धनश्री सरदेसाई, अण्णू कटांबळे, के. पी. पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. निरांतरा विशेषांकाचे प्रकाशन विश्‍वास दांगट यांच्या हस्ते तर प्रकाश चव्हाण यांनी सुब्रम्हण्य प्रतिमा पूजन केले. एन. यु. भुत्तेवाडकर यांनी छ. शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन केले. मेरडा ग्रा. पं सदस्य महाबळेश्‍वर पाटील यांनी विठ्ठलराव पाटील साहित्यनगरीचे उद्घाटन केले.  काशीनाथ पारिश्‍वाडकर यांनी कै. सावित्री पाटील प्रवेशद्वाराचे उद्घाटन केले.  विलास बेळगावकर यांनी शिवाजी दुगाणे सभागृहाचे उद्घाटन केले. संजीव वाटुपकर यांनी सूत्रसंचालन केले. अकादमीचे कार्यवाहक   एम. पी. गिरी यांनी आभार मानले.

दिमाखदार ग्रंथदिंडी

गावातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. शिवाजी पाटील यांनी ग्रंथदिंडीचे उद्घाटन झाले. एकनाथ मंदिरापासून दिंडीला सुरुवात करण्यात आली. शाळेच्या विद्यार्थ्यांनी घोषणांचे फलक हाती घेतले होते. कलशधारी महिलांचा सहभाग होता. वारकर्‍यांची पालखी होती.