Mon, Apr 22, 2019 16:31होमपेज › Belgaon › ‘पीएलडी’ चेअरमनपद ‘मराठी’कडे

‘पीएलडी’ चेअरमनपद ‘मराठी’कडे

Published On: Sep 08 2018 1:31AM | Last Updated: Sep 07 2018 10:36PMबेळगाव : प्रतिनिधी

काही दिवसांपासून पीएलडी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदावरून सुरू असलेल्या कुरघोड्यांवर शुक्रवारी (दि. 7) अखेर पडदा पडला. पीएलडी बँकेच्या अध्यक्षपदी मराठी भाषक महादेव पाटील व उपाध्यक्षपदी बापूसाहेब जमादार यांची बिनविरोध निवड झाली. दोन्ही सदस्य आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या गटाचे असले, तरी अध्यक्षपद ‘मराठी’ला मिळाल्याने ‘पीएलडी’वर ‘मराठी’चे वर्चस्व स्पष्ट झाले. 

महाद्वार रोड येथील पीएलडी बँकेच्या सभागृहात शुक्रवारी निवडणूक पार पडली. या दोघांव्यतिरिक्‍त कुणीही अर्ज दाखल न केल्याने वरील निवड जाहीर करण्यात आली. यापूर्वी पीएलडी बँकेवर जारकीहोळी बंधूंचे वर्चस्व होते. यावेळी मराठीच्या पाच सदस्यांची निवड झाली होती. यामुळे मराठी भाषकच अध्यक्ष होणार, अशी स्पष्ट चिन्हे होती. मात्र, मराठी गटातील काही जण आ. हेब्बाळकर गटाला मिळाल्याने गटाचे वर्चस्व राहिलेे. या निवडणुकीवरून आ. हेब्बाळकर व जारकीहोळी बंधूंमध्ये कडवा संघर्ष होता. या वादात काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांनीही भाग घेऊन वाद मिटविला. कर्नाटक काँग्रेस प्रदेश कमिटीचे अध्यक्ष माजी मंत्री ईश्‍वर खंड्रे यांनी बेळगावमध्ये येऊन शुक्रवारी सकाळी तिन्ही आमदारांशी चर्चा केली व या वादावर पडदा टाकला. यानंतर आ. हेब्बाळकर गटाच्या सदस्यांची अध्यक्ष व उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड  करण्यात आली. पीएलडी बँकेच्या आवारात प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बँकेच्या 200 मीटर परिसरात 144 कलम लागू करण्यात आला होते. महाद्वार रोड परिसरातील जुन्या पीबी रोडवरील पुलापासून कपिलेश्वर पुलापर्यंतच्या परिसरात सात ते रात्री दहापर्यंत जमावबंदी जारी करण्यात आली. गुरुवार रात्रीपासून बंदोबस्तात वाढवला होता.

बिनविरोध संचालक

बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांमध्ये महादेव यल्लाप्पा पाटील (उचगाव), बापूसाहेब जमादार (मारीहाळ), सचिन शिवाप्पा कोलकार, महांतेश निंगनगौडा पाटील, महंतेश नागप्पा उळागड्डी, मुशाप्पा रामनगौडा हट्टी, बापूगौडा शिवनगौैडा पाटील, गीता बाबू पिंगट, शंकर यल्लाप्पा नावगेकर, परशराम निंगाप्पा पाटील, रेखा सूर्याजी कुट्रे, चिदंबर देवाप्पा कुडची, रामाप्पा सत्याप्पा गुळली, प्रसाद राजशेखर पाटील यांचा समावेश आहे.