Sat, Apr 20, 2019 09:51होमपेज › Belgaon › ‘मध्यवर्ती’वर तोंडसुख घेणार्‍यांना हिसका

‘मध्यवर्ती’वर तोंडसुख घेणार्‍यांना हिसका

Published On: Apr 20 2018 1:17AM | Last Updated: Apr 20 2018 12:47AMबेळगाव : प्रतिनिधी

मध्यवर्ती म. ए. समितीच बरखास्त करण्याची मागणी करणार्‍या वाय. बी. चौगुले यांना एका कार्यकर्त्याने त्याबद्दल जाब विचारताना धक्काबुक्कीही केली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकीचा आग्रह, असतानाही फूट पाडणार्‍यांविरुद्ध असंतोष धुमसत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

एका वृत्तपत्राच्या माध्यमातून  वाय. बी. चौगुले यांनी मध्यवर्ती म. ए. समिती बरखास्त करण्याची मागणी केली होती. यामुळे सीमाभागात संतापाची लाट उसळली. परिणामी गुरुवारी सायंकाळी चौगुले यांना शिवाजी रोडवर अडवून धक्काबुक्की करण्यात आली.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सध्या म. ए. समितीमध्ये एकीची प्रक्रिया सुरू आहे. त्याला काही नेत्यांचा अपवाद वगळता चांगला प्रतिसाद लाभत आहे. यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र काहींनी यामध्ये खो घालण्याचा प्रयत्न चालविला असून एकी होवू नये, यासाठी छुप्पे प्रयत्न चालविले आहेत. त्यामुळे सामान्य कार्यकर्ते संतप्त बनत आहेत. तालुका म. ए. समितीमध्ये देखील एकीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी दुसर्‍या गटाचे कार्याध्यक्ष असणार्‍या वाय. बी. चौगुले यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला आहे. परंतु, गुरुवारी एका वृतपत्रातून मध्यवर्ती म. ए. समितीवर तोंडसुख घेणारे वृत प्रसिद्ध करण्यात आले. यामुळे कार्यकर्त्यामध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्याचे पर्यवसान मारहाणीत झाले.

कार्याध्यक्ष वाय. बी. चौगुले गुरुवारी सायंकाळी 4 च्या सुमारास हे शिवाजी रोडवरून आपल्या गाडीतून जात होते. रस्त्यावर गर्दी असल्यामुळे चौगुले यांची गाडी सावकाश जात होती. यावेळी तेथून जाणार्‍या एका कार्यकर्त्याने चौगुले यांना जाब विचारला. तसेच मारहाण करण्यास सुरुवात केली. त्या कार्यकर्त्याला त्याच्या सहकार्‍याने रोखले. त्यानंतर मराठी गटाच्या सदर मारहाणीच्या घटनेचा निषेध केला आहे. हा प्रकार म्हणजे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आला.