Sun, Apr 21, 2019 03:51होमपेज › Belgaon › बेळगावच्या उपमहापौरपदी मधुश्री पुजारीच

बेळगावच्या उपमहापौरपदी मधुश्री पुजारीच

Published On: Mar 03 2018 1:52AM | Last Updated: Mar 02 2018 11:26PMबेळगाव : प्रतिनिधी

गुरुवारी झालेल्या निवडणुकीत कन्नड भाषक नगरसेवक बसाप्पा सिद्दाप्पा चिक्कलदिनी यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली. मराठी गटाच्या नगरसेविका मधुश्री आप्पासाहेब पुजारी यांची उपमहापौरपदी 31 विरुद्ध 23 मतांनी निवड झाली. शांता उप्पार यांचा त्यांनी पराभव केला. 

उपमहापौरपदी पुजारी यांचीच निवड होण्याची शक्यता जास्त आहे, असा अंदाज दै. ‘पुढारी’ने बुधवारीच वर्तवला होता. गुरुवारी तो खरा ठरला. मात्र 58 पैकी 32 सदस्य म्हणजेच बहुमत असलेल्या मराठी गटाकडे आरक्षित महापौरपदासाठी  अनुसूचित जमातीचा सदस्य नसल्याने महापौरपद गमवावे लागले. विद्यमान सभागृहात आतापर्यंत चार महापौर व चार उपमहापौर मराठीच राहिले. मात्र पाचव्या वेळी आरक्षणामुळे मराठी गटाचा हक्क हिरावला गेला.

गुरुवारी सकाळी प्रादेशिक आयुक्‍त पी. ए. मेघण्णावर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रियेचा प्रारंभ झाला. महापौरपदासाठी कन्नड-ऊर्दू गटातून केवळ चिक्कलदिनी यांनीच अर्ज केला होता. सुचेता गडगुंद्री यांच्या नावाची चर्चा असूनही त्यांनी अर्ज केला नाही. त्यामुळे चिक्कलदिनी यांची बिनविरोध निवड झाली. उपमहापौरासाठी मराठी गटातून मधुश्री पुजारी, मीनाक्षी चिगरे व मेघा हळदणकर यांच्यासह विरोधी कन्नड सदस्या शांता हणमंत उप्पार यांनी अर्ज दाखल केले होते. चिगरे व हळदणकर यांनी पुजारी यांच्यासाठी अर्ज मागे घेतले. यामुळे पुजारी आणि उप्पार यांच्यासाठी मतदान झाले. यात पुजारी यांना 31 तर शांता उप्पार यांना 23 मते मिळाली.  

महापालिकेत मराठी भाषकांचे वर्चस्व आहे. गेल्या चार वर्षांत महापौर, उपमहापौरपदी मराठी भाषकाची वर्णी लागली होती. मात्र महापालिकेवर मराठी भाषकांचे असलेले वर्चस्व कर्नाटक सरकारच्या डोळ्यात नेहमीच खुपत आले आहे. यामुळे यावेळच्या महापौरपदासाठी मराठी गटाकडे नसलेल्या अनुसूचित जमातीचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यामुळे बहुमत असतानाही मराठी गटाला महापौरपदापासून वंचित राहावे लागले.

किरण सायनाक रुग्णालयात 

ज्येष्ठ नगरसेवक किरण सायनाक यांनी प्रत्येक निवडणुकीत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. टीका सहन करत सायनाक यांनी मनपावर मराठी गटाची सत्ता अबाधित राखण्याचे प्रयत्न केले. आताही सायनाक यांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले. तरीही त्यांनी उपमहापौर मराठीच होणार, असा विश्‍वास दै. ‘पुढारी’कडे व्यक्‍त केला होता.

पुजारी दाम्पत्याचा आगळा बहुमान

उपमहापौर निवडणुकीत विजयाची माळ मधुश्री पुजारी यांच्या गळ्यात पडली. 1998- 99 मध्ये मधुश्री यांचे पती आप्पासाहेब यांना महापौरपदाचा मान मिळाला होता. महापालिकेच्या इतिहासात पती-पत्नीला महापौर-उपमहापौरपद मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

कोणाची सरशी तर कुणाची नाराजी

निवडणुकीच्या निमित्ताने बेळगावच्या राजकारणाला कलाटणी मिळाली. बर्‍याच वेळा जारकीहोळी बंधूंतील वादावर चर्चा होत असते. मात्र वादामागेही या बंधूंचे राजकारण दडलेले असते. महापौर निवडणुकीत आ. सतीश जारकीहोळी समर्थक चिक्‍कलदिनी विजयी झाले. पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या समर्थक सुचेता गडगुंद्री ऐनवेळी निवडणुकीपासून अलिप्त राहिल्या. याचे सर्वांना आश्‍चर्य वाटले.

महापौर निवडणुकीसाठी आ. फिरोज सेठ यांनीही कंबर कसली होती. काही मराठी सदस्य आपल्या उमेदवाराच्या पाठीशी राहावेत, यासाठी त्यांनी प्रयत्न होते. मात्र जारकीहोळी बंधूंच्या बेरकी राजकारणाने आ. सेठ यांच्यावर कडी केली. यामुळे  सेठ निवडणुकीच्या अंतिम क्षणी मनपातून बाहेर पडले.

निवडणूक जाहीर झाल्यानंतर मराठी गोटात शांतता होती. निवडणुकीच्या आदल्या दिवशी सर्वांना आंबोलीला जाण्याचे फर्मान होते. काही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. अखेर 24 सदस्य बुधवारी आंबोलीला गेले. तेथे इच्छुक उमेदवारांसाठी गुप्त मतदान घेण्यात आले. कौल मनपात जाहीर करण्याच्या निर्णयावर काहींनी नाराजी दर्शवली.

गुरुवारी सकाळी मराठी गटातून उपमहापौरपदासाठी पुजारी यांच्यासह चिगरे व हळदणकर यांनी अर्ज दाखल केले. चिगरे माघार घेणार असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे हळदणकर व पुजारी यांच्यातच स्पर्धा होती. महापौर कक्षात खलबते झडली. काही नेत्यांनी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 

याचवेळी प्रकृती अस्वस्थ असतानाही आ. संभाजी पाटील महापौर कक्षात आले. पुजारी यांचे पती आप्पासाहेब महापौर कक्षाबाहेर सल्लामसलत करत होते. विनायक गुंजटकर, रायमन वाझ, नागेश मंडोळकर यांच्या शिष्टाईतून अखेर उपमहापौरपदाचा तिढा सुटला.