Mon, Jun 17, 2019 04:11होमपेज › Belgaon › माचीगड संमेलनात उमटला विद्रोहाचा हुंकार

माचीगड संमेलनात उमटला विद्रोहाचा हुंकार

Published On: Jan 02 2018 12:58AM | Last Updated: Jan 01 2018 11:35PM

बुकमार्क करा
खानापूर : वासुदेव चौगुले

साहित्य आणि समाज दोन्ही ठिकाणी माणूसच केंद्रस्थानी असला पाहिजे. ही गरज व्यक्त करत विवेकवादाचा आवाज बंदुकीच्या गोळीने संपवता येणार नाही. त्यासाठी  सर्वसामान्यांनी क्रांतीचे नेतृत्व करावे, अशी अपेक्षा माचीगड साहित्य संमेलनातील प्रमुख व्याख्यात्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रातील विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी आणि इतिहास संशोधक प्रा. गंगाधर बनबरे यांच्या अभ्यासपूर्ण व्याख्यानांनी वारकरी, महिला आणि बालक-पालक वर्गाचेही समाजप्रबोधन झाल्याने 21 वे संमेलन वैशिष्ट्यपूर्ण ठरले.

मराठी भाषेच्या महतीविषयी प्रा. परदेशी म्हणाल्या, कोणतीही भाषा अचानक जन्माला येत नाही. समूहजीवन आणि संवादाची गरज म्हणून भाषा उदयास आली. कष्टकरी, शेतकरी आणि श्रमजीवी समाज भाषेच्या उत्पत्तीचा खरा जनक आहे. आपल्या सर्वांचे अस्तित्वच भाषेशी जोडले गेले आहे. जीवन पद्धती आणि भाषिक व्यवहारांचे तत्त्व संमेलनांमुळे अधिक दृढ होते. प्रमाण भाषेचे स्तोम माजवून आम्ही ठरवू तेच इतरांनी बोलले पाहिजे, असा दुराग्रह बाळगणे चुकीचे आहे.

लोकभाषेला दुय्यम लेखणार्‍यांचा समाचार घेताना त्या म्हणाल्या, प्रमाण भाषेचे निकष बदलले पाहिजेत. लोकांसाठी भाषा असून तिच्या वापरावर कोणीही नियम वा निकषांद्वारे निर्बंध लादू शकत नाही. सांस्कृतिक दहशतवाद आणि धर्माच्या नावावर देश वेठीस धरू पाहणार्‍या विचारांनी माणसाला आंधळे केले आहे. विवेकाचा जागर करणार्‍या आणि समतावादी विचार पेरणार्‍या विचारवंतांचे मुडदे पाडले जात असताना जनतेने गप्प बसून चालणार नाही.

महिलांच्या हक्काबाबत त्या म्हणाल्या, हिंदू स्त्रीयांना दहा-दहा मुले जन्माला घाला म्हणणार्‍यांना आजचे वैद्यकशास्त्र आणि विज्ञानच कळले नाही. गृहश्रम करणार्‍या स्त्रीने विनामोबदला घरची कामे करावीत. मात्र तोच टेलरिंग आणि कुकिंगचा व्यवसाय पुरुषांनी अभिमानाने प्रोफेशन म्हणून मिरवावा, अशी आजची स्थिती आहे. स्त्रीयांचा हिंसाचार मान्य करणारी आपली संस्कृती असूच शकत नाही. स्त्रीयांकडे बघण्याची चंगळवादी, भोगवादी दृष्टी बदलायला हवी. त्याकरिता साहित्याचे मापदंड बदलण्याबरोबरच समानतेने विचार करणारा समाज घडवायला हवा

प्रा. बनबरे म्हणाले, ज्ञानाचा मक्ता एकाच जातीने घेऊ नये. धर्म व संस्कृतीच्या नावाखाली कुणी काय खावे अन् कोणी काय परिधान करावे याबाबत राज्यघटनेने स्वातंत्र्य दिलेले असतानाही सांस्कृतिक पोलिसगिरी करणार्‍या सेनांच्या पलटणी निकोप समाजासाठी घातक आहेत. याचा विचार करण्याची वेळ आली आहे.