Fri, Jul 19, 2019 13:44होमपेज › Belgaon › ‘सुराज्या’साठी धर्मवीर संभाजी महाराजांचे योगदान : खा. संभाजीराजे 

‘सुराज्या’साठी धर्मवीर संभाजी महाराजांचे योगदान : खा. संभाजीराजे 

Published On: Mar 21 2018 1:41AM | Last Updated: Mar 20 2018 10:56PMमंगसुुळी : वार्ताहर

धर्मवीर संभाजी महाराजांनी बहुजनांच्या हिताची अनेक कामे केली. स्वराज्याचे सुराज्य व्हावे यासाठी त्यांनी केलेले कार्य महान आहे. त्यांनी लहान वयात अनेक ग्रंथ लिहून समाजाला जागृत केले, असे विचार कोल्हापूरचे खा. संभाजी राजे यांनी मांडले. येथील बहुजन जागृती विचार संघाच्यावतीने आयोजित बहुजन महामेळाव्यात ते बोलत होते. 

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मंगसुळीचे सरकार विक्रांत पवार-देसाई होते. व्यासपीठावर पीएसआय जी. एस. बिरादार, वैशालीताई डोळस (औरंगाबाद), अमोल मेटकरी (अकोला), अभयसिंह पाटील, सुयोग औंधकर, ग्रा. पं. अध्यक्ष बाळासाहेब पाटील उपस्थित होते. विविध जातीधर्मातील प्रमुख व्यक्तींचा तसेच समाजसेवक, कलाकार, साहित्यिक, आदर्श माता, आदर्श पुत्र, कन्या आदींचा मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. 

मुख्य वक्ते म्हणून अमोल मिटकरी म्हणाले की, महाराजांविषयी लिहिलेल्या जीवनपटात अनेक तफावती असल्याने मराठा समाजमनावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मराठ्यांची मने चलबिचल करणारी पुस्तके छापली जातात. संभाजी महाराज हे रयतेचे राजे होते. मात्र काही समाजकंटकांनी अर्थाचा अनर्थ करून पुस्तके छापल्यामुळे तसेच टीव्हीच्या माध्यमातून होणार्‍या प्रसारणामुळे त्यांच्या सत्वशील चारित्र्याला गालबोट लागल्यासारखे वाटते. संभाजी महाराज धार्मिक होते, धर्मांध नव्हते. व्याख्यात्या वैशाली डोळस यांनी ‘स्त्री-काल, आज आणि उद्या’ या विषयावर भाषण केले. त्या म्हणाल्या, शिक्षणप्रेमी सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेणे आवश्यक आहे. 

महिलांनी चूल, मूल सांभाळण्यापेक्षा समाजात मानाचे स्थान मिळविण्यासाठी पुरुषांप्रमाणे समाजात वावरायला हवे. देशात स्त्री देवतांची मंदिरे सर्वाधिक आहेत. स्त्री ही घरची कुलस्वामिनी आहे. तिला सन्मानानेच वागविले पाहिजे, असे डोळस म्हणाल्या.