Sat, May 25, 2019 23:44होमपेज › Belgaon › रोहयो मजुरीत तेरा रुपये वाढ

रोहयो मजुरीत तेरा रुपये वाढ

Published On: Jun 02 2018 2:00AM | Last Updated: Jun 01 2018 7:46PMबेळगाव : प्रतिनिधी

विविध कारणांमुळे गावातील नागरिक रोजगारानिमित्त शहराकडे स्थलांतरित होतात. त्यावर उपाययोजनेसाठी ग्रामीण रोजगार हमी योजना जारी झाली आहे. त्या अंतर्गत देण्यात येणार्‍या दैनंदिन मानधनात तेरा रुपयांची वाढ करण्यात आली आहे. शिवाय कामासाठी लागणारे साहित्य वाहून नेण्याकरिता अतिरिक्त 10 रुपये मंजूर करण्यात येत आहेत. 

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत (रोहयो) 2017-18 मध्ये 236 रुपये दिले जात होते. आता 249 रुपये देण्यात येत आहेत. साहित्य वाहून नेण्यासाठी अतिरिक्त 10 रुपये योजनेतून मंजूर करता येतात. याद्वारे ग्रामस्थांना योजनेकडे आकर्षित करण्यात येत आहे. विविध वर्गातील रोहयो कर्मचार्‍यांना कामामध्ये सवलत दिली जाते. (40 टक्के दिव्यांग) आणि वयाची 65 वर्षे ओलांडलेल्यांना हिरव्या रंगाचे जॉब कार्ड दिले जाणार आहे. त्यांना कामामध्ये 50 टक्के सवलत मिळणार आहे. अशा जॉब कार्डधारकांना कामाच्या ठिकाणी कठीण कामे लावली जाणार नाहीत. रोहयो कर्मचार्‍यांना पिण्यासाठी पाणी देणे, कर्मचार्‍यांच्या मुलांना सांभाळणे, रोपे लावणे, नव्या इमारत बांधकामाच्या ठिकाणी पाणी मारणे अशी कामे हिरव्या जॉब कार्डधारकांना करावी लागणार आहेत. 

अशी कामे करण्यात त्यांना मोठे कष्ट घ्यावे लागणार नाहीत. त्यांच्या कुवतीनुसार ते सोपी कामे करू शकतात. दुष्काळ आणि इतर कारणांमुळे ग्रामस्थांपुढे पाटाचा प्रश्‍न निर्माण होतो. त्यासाठी ते रोजगाराच्या शोधात शहराकडे जातात. दिवसेंदिवस ग्रामस्थांचा शहराकडील ओढा वाढत आहे. त्यावर नियंत्रणासाठी तसेच गाव पातळीवर विकासकामे करण्यासाठी ग्रामीण रोजगार हमी योजना अस्तित्वात आली. त्याला प्रतिसाद मिळत आहे. योग्य मानधन आणि वर्षातील शंभर दिवस काम मिळत असल्याने त्याचा पुरेपूर लाभ ग्रामस्थ घेत आहेत.