Fri, Apr 26, 2019 17:21होमपेज › Belgaon › लग्नाच्या तगाद्यामुळेच पूनमचा खून

लग्नाच्या तगाद्यामुळेच पूनमचा खून

Published On: Mar 21 2018 1:41AM | Last Updated: Mar 20 2018 11:41PMखानापूर : प्रतिनिधी

अस्तोलीजवळ आढळलेल्या तरुणीच्या खून प्रकरणाचा छडा लावण्यात खानापूर पोलिसांना अवघ्या चार दिवसांत यश आले. प्रियकरानेच भावाच्या मदतीने हा खून केल्याचे तपासात उघड झाले. या प्रकरणी सुनील ऊर्फ आर्य विश्‍वनाथ चव्हाण (25) आणि संजय चव्हाण (22, दोघेही रा. ता. गंगाखेड जि. परभणी) या सख्या भावांना अटक करण्यात आली. आंतरजातीय प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

15 मार्च रोजी अस्तोलीजवळ  तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. तपासात तिचे नाव पूनम बाळासाहेब ब्राम्हणी (22) रा. दाणोरी गल्ली, सांगाव, जि. नगर असे असल्याचे निष्पन्न झालेे. तिच्या आईने बेळगावला येऊन मुलीचा खून झाल्याची तक्रार जिल्हा पोलीस प्रमुख सुधीर रेड्डी यांच्याकडे केली होती. खानापूर पोलिसांची दोन पथके पुणे, नगर व औरंगाबादला गेली होती.

संशयित सुनीलचे पूनमशी प्रेमसंबंध होते. सुनील मागासवर्गीय जातीचा तर पूनम अनुसूचित जातीची असल्याने सुनीलच्या घरच्यांचा त्यांच्या प्रेमास व लग्नास विरोध होता. यामुळे सुनीलने लग्नास टाळाटाळ चालविली होती. पूनम लग्नासाठी त्याच्याकडे तगादा लावत होती. यापासून कायमची सुटका करून घेण्यासाठी सुनीलने लहान भाऊ संजय याच्या मदतीने तिला संपविण्याचा कट रचला. गोवा प्रवासाच्या निमित्ताने कारने पूनमला अस्तोलीनजीक आणले. उशीने तिचे तोंड दाबून धरले. यातच गुदमरून तिचा मृत्यू झाला. खुनाला आत्महत्या भासविण्यासाठी पुलावरून तिला खाली फेकून देण्यात आले.

तपासाची सूत्रे रेड्डी यांनी घेतली. पूनम पुण्यातील दवाखान्यात नर्स होती. आईने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी तपास केला. बैलहोंगल उपअधीक्षक करुणाकर शेट्टी, खानापूरचे मोतीलाल पवार, उपनिरीक्षक संगमेश होसमणी, एस. बी. बळ्ळारी, एन. व्ही. गावकर आदींनी परिश्रम घेतले.