Thu, Jun 20, 2019 02:05होमपेज › Belgaon › प्रेमी युगुलाने केला ग्रहण काळात विवाह!

प्रेमी युगुलाने केला ग्रहण काळात विवाह!

Published On: Jul 31 2018 1:30AM | Last Updated: Jul 30 2018 11:07PMहुबळी : प्रतिनिधी

समाजात असणार्‍या अंधश्रद्धा दूर करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकताना चित्रदुर्ग येथे मठाधीशांच्या साहाय्याने ग्रहणादिवशी विवाह, दीक्षा समारंभ पार पाडण्यात आला.

चित्रदुर्गमधील शिवमूर्ती स्वामींनी पुढाकार घेतला. मरडी रंगनायक आणि हुवीनहोळे (ता. हिरियूर) वसंताकुमारी हे दोघेही सात वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करत होते. नायक हा वाहनचालक आणि फळविक्रेता आहे. वसंताकुमारी ही वाणिज्य शाखेची पदवीधर आहे. याविषयी बोलताना या नवदांपत्याने ग्रहणावर आपण विश्‍वास ठेवत नसल्याचे सांगितले. वैज्ञानिकदृष्ट्या ग्रहणाचे महत्त्व वेगळे आहे. पर्यावरणात यामुळे काही बदल होतात. पण, मानवाच्या राहणीमानावर तसेच इतर दैनंदिन कामांवर याचा परिणाम होत नाही. जुन्या काळापासून ग्रहणाविषयी असणार्‍या गैरसमजुती, अंधश्रद्धांवर कुणीच विश्‍वास ठेवू नये, असा संदेश सर्वांपर्यंत पोचविण्यासाठी ग्रहणादिवशी विवाह केल्याचे दांपत्याने सांगितले.

नेहमीच अंधश्रद्धा आणि समाजात पसरलेल्या गैरसमजुती दूर करण्याचा प्रयत्न करणारे शिवमूर्ती स्वामींनी ग्रहणाबाबत असणार्‍या अंधश्रद्धेविरोधी जागृतीचा प्रयत्न केल्याचे सांगितले. ग्रहण आणि त्यामुळे होणार्‍या संभाव्य परिणामांची माहिती मनोरंजनात्मक पद्धतीने काही टीव्ही वाहिन्यांनी प्रसारित केली. अनेक ठिकाणी याबाबत अंधश्रद्धा पसरविण्यात आल्या. पण, ग्रहण ही नैसर्गिक प्रक्रिया असून त्याचे निरीक्षण करण्याची सवय लोकांनी लावून घेतली पाहिजे. मानवाने आपल्या गरजेनुसार वेळेची चांगली आणि वाईट अशी विभागणी केली आहे. पण, वेळ कधीच चांगली किंवा वाईट नसल्याचे परखड मत त्यांनी व्यक्‍त केले.

विविध संघटनांनी हुबळी आणि गदग येथे विविध ठिकाणी ग्रहणाचे वेध लागल्यानंतर भोजनाची व्यवस्था केली. ग्रहण काळात जेऊ नये, कोणतीही कामे करू नयेत किंवा इतर अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात आला. हुबळीतील संगोळ्ळी रायण्णा चौकात 75 जणांनी भोजनाचा लाभ घेतला.