Fri, Apr 26, 2019 19:49होमपेज › Belgaon › बेळगाव तालुक्यातील दूध उत्पादकांची लूट 

बेळगाव तालुक्यातील दूध उत्पादकांची लूट 

Published On: Aug 27 2018 1:12AM | Last Updated: Aug 26 2018 11:21PMबेळगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील काही नामांकित दूध संघांच्या चिलिंग सेंटरमध्ये फॅट व एसएनएफमध्ये तांत्रिक बिघाडाद्वारे घट दाखवून लिटरमागे तीन ते चार रुपये कमी दर देत आहेत, अशी काही दूध उत्पादकांची तक्रार आहे. हा प्रकार दूध उत्पादकांना तोट्यात आणणारा असून अशा प्रकारापासून उत्पादकांनी वेळीच सावध राहण्याची गरज आहे. 

अगोदर हातात पडणारा दर न परवडणारा आहे. त्यातच छुप्या मार्गाने फॅट व एसएनएफ कमी दाखवून उत्पादकांच्या  जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार सुरु आहे. सीमाभाग दूध उत्पादनासाठी अनुकुल आहे. या परिसरातील गाय दूधाचे फॅट 4.0 व एसएनएफ 8.5 तर म्हैस दूधाचे फॅट 6.0 व एसएनएफ 9.0 इतके आहे. 

मात्र असे प्रमाण कोणत्याही उत्पादकांना मिळत नाही. गाय दुधाचे फॅट 4.0 व एसएनएफ 8.5 असेल तर प्रति लिटर 21.40 रुपये तर म्हैस दूधाचे फॅट 6.0 व एसएनएफ 9.0 असेल तर 38.50 रुपये दर देणेे शक्य आहे. मात्र गेल्या काही वर्षांत हा दर मिळत नसल्याचा उत्पादकांचा आरोप आहे. शिवाय फॅट व एसएनएफमध्ये असा दर नामांकित दूध संघाकडून मिळत नसल्याने यामध्ये काही तरी काळेबेरे असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. उत्पादकांनी आपल्या दूध संकलन केंद्रात योग्य ती चाचणी होते का नाही, यासाठी स्वत: आग्रही राहण्याची गरज आहे. फॅट व  एसएनएफ मध्ये घट असल्याचे भासवून बोनसही नाकारला जात आहे. काही शेतमजूरांचा चरितार्थ केवढ दूध उत्पादनावर सुरु आहे. मात्र अशा गैर प्रकारामुळे नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे.