Tue, Jul 07, 2020 23:27होमपेज › Belgaon › बेळगाव येथील गांजा उत्पादनावर नजर

बेळगाव येथील गांजा उत्पादनावर नजर

Published On: Jul 11 2018 1:35AM | Last Updated: Jul 10 2018 11:45PMबंगळूर : प्रतिनिधी

बेळगावसह संपूर्ण राज्यात अमली पदार्थांच्या सुळसुळाटावर नियंत्रण ठेवण्यात येणार असून कर्नाटकाला ‘उडता पंजाब’ होऊ देणार नसल्याचे उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्‍वर यांनी विधान परिषदेत सांगितले. मंगळवारी ते प्रश्‍नोत्तराच्या तासावेळी बोलत होते. अमली पदार्थाची वाहतूक, विक्रीवर गृह खात्याची नजर आहे. अशा टोळ्यांमागे कुणीही असले तरी कठोर कारवाई हाच पर्याय असेल. पंजाबमध्ये तेथील सरकारने उडता पंजाब विरोधात कठोर कारवाई केली आहे. कर्नाटकातही कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.

‘इसिस’कडून युवकांना अमली पदार्थाची चट लावून त्यांना जाळ्यात ओढण्याचा कट असल्याबाबत कोणतीच माहिती सरकारला मिळालेली नाही. पण केवळ पैसे कमविण्यासाठी अमली पदार्थाची वाहतूक, विक्री काहीजण करत असल्याचे दिसून आले आहे. 

बेळगाव, हासन, चिक्‍कबळ्ळापूरसह काही ठिकाणी पिकांमध्ये गांजा पिकविला जात असल्याचे उघडकीस आले आहे. तेथील पोलिसांनी वेळोवेळी छापे घालून कारवाई केली. बंगळुरातील केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर काही दिवसांपूर्वी पाच कोटी रुपयांच्या औषधी गोळ्या सापडल्या होत्या. देवनहळ्ळी परिसरात काही औषध कंपन्या आहेत.  त्या परिसरात औषधी गोळ्यांमध्ये अमली पदार्थ भरून  वाहतूक करण्यात येत असल्याचा सुगावा लागला आहे. 

शालेय विद्यार्थ्यांनाही अमली पदार्थांची चट लावण्याचा प्रकार काही ठिकाणी आढळून आला आहे. शाळा परिसरात असणार्‍या काही दुकानांतून पहिले दोन दिवस सामान्य चॉकलेट दिले जाते. तिसर्‍या दिवशी अमली पदार्थमिश्रित चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांना व्यसनी बनविले जात असल्याचे तपासावेळी उघडकीस आल्याची माहिती परमेश्‍वर यांनी दिली.

काँग्रेस-निजद युती सरकार सत्तेवर आल्यानंतर किनारपट्टी भागातील अमली पदार्थाची विक्री, वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. आगामी काळात अशा प्रकरणात अडकलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे परमेश्‍वर म्हणाले.