Fri, Aug 23, 2019 15:18होमपेज › Belgaon › बंगळूरलाही भारी बेळगाव ! 

बंगळूरलाही भारी बेळगाव ! 

Published On: Aug 21 2018 1:31AM | Last Updated: Aug 20 2018 7:58PMबेळगाव : प्रतिनिधी

केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणात राहण्यायोग्य शहरांच्या बाबतीत बेळगावने बंगळूरला मागे टाकले असून मंगळूरपाठोपाठ दुसरे स्थान पटकावले आहे. राहणीमानाशी संबंधित सुखसोयी, शिक्षण, सुरक्षिततेसह विविध निकष लावताना एकूण 111 शहरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये कर्नाटकातील सात शहरांचा समावेश करण्यात आला आहे. मंगळूरने 41 वा आणि बेळगावने 52 वा क्रमांक मिळविला आहे. तर कर्नाटकाची राजधानी आणि अनेक सुखसोयी असणार्‍या बंगळूरने 58वा क्रमांक मिळविला.

शहरांचे सर्वेक्षण करताना विविध चार विभागांतील चौदा प्रकारांकरिता 100 गुण देण्यात आले. सर्व शहरांनी एकूण 50 हजारपेक्षा अधिक मुद्दे असणारी माहिती गृहनिर्माण मंत्रालयाकडे पाठविली. ते सर्व मुद्दे विचारात घेऊन मूल्यमापन करण्यात आले.  60 हजार शहरवासीयांची मते जाणून घेण्यात आली. सर्व शहरांचे लोकसंख्येच्या आधारावर वर्गीकरण करण्यात आले.

प्रशासनाच्या दृष्टीने आवश्यक असणार्‍या संस्थात्मक आधारस्तंभाच्या बाबतीत मंगळूरला 10.25 गुण देण्यात आले. सामाजिक आधारस्तंभाच्या शिक्षण आणि आरोग्याच्या बाबतीत 3.47 गुण मिळाले. सर्वेक्षण करताना नियमित विकासाचे मुद्दे विचारात घेण्यात आले. यापैकी आठ मुद्दे शहरवासीयांच्या राहणीमानासंबंधी होते. 

आश्‍चर्य म्हणजे राज्यात सर्वाधिक इस्पितळे, वैद्यकीय संस्था असल्या तरी आरोग्य विभागात मंगळूर शहराने 55वा क्रमांक मिळविला आहे. या बाबतीत बेळगाव 35व्या स्थानावर आहे. तर शिमोग्याला 12 वे, हुबळी 48 आणि बंगळूरला 103 वे स्थान मिळाले आहे.