Tue, Jun 25, 2019 13:47होमपेज › Belgaon › महामार्गावरील हॉटेलमध्ये नियम धाब्यावर बसवून तळीरामांची सोय

महामार्गावरील हॉटेलमध्ये नियम धाब्यावर बसवून तळीरामांची सोय

Published On: Dec 08 2017 1:36AM | Last Updated: Dec 07 2017 8:37PM

बुकमार्क करा

बेळगाव : श्रीकांत काकतीकर

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महामार्गावरील मद्यविक्री दुकाने बंद झाली. न्यायालयाच्या या आदेशामुळे  तळीरामांची चांगलीच गोची झाली. मात्र काहींनी महामार्गावरील धाबे आणि हॉटेलमधून अवैधरीत्या मद्यविक्री चालविली आहे. त्याचबरोबर शहरात वेळेचे बंधन आणि नियम डावलून मद्यविक्री सुरु आहे. मद्यविक्रीचा ‘बे’लगाम कारभार सुरु असताना प्रशासनाने आपल्या डोळ्यावर अर्थकारणाची पट्टी बांधून घेतली आहे.

म. गांधीजींनी देशात दारूबंदी झाली तरच देशाचा निकोप विकास होईल, असे म्हटले होते. परंतु स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय पातळीवरील व राज्य पातळीवरील राजकीय नेत्यांनी दारूबंदीऐवजी निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदारांना विविध प्रकारची आमिषे दाखवून सत्तेवर येण्याचेच धोरण राबविले. यामध्येही निवडणूक काळात तळीराम मतदार आणि कार्यकर्त्यांची बडदास्त राखण्यासाठी उमेदवार चढाओढ करतात. त्याची गंभीर दखल निवडणूक आयोगालाही घ्यावी लागली आहे.

अबकारी खाते काही नियम व अटी घालून दारू विक्रीचे परवाने देते. 100 मीटरच्या आत शाळा, महाविद्यालये, मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वार किंवा महापुरुषांचे पुतळे असतील तर त्याठिकाणी दारू दुकान सुरू करण्यास अबकारी खात्याकडून नकार देण्यात येतो. दारू दुकानामुळे समाजातील सर्व घटकांना कोणताही उपद्रव होता कामा नये, असा दंडक घातला जातो. त्याशिवाय दारू दुकान चालविण्यास अबकारी खाते वेळेचे बंधन घालून परवाना देते.

संपूर्ण कर्नाटक राज्यामध्ये दारू दुकान उघडण्याची वेळ सकाळी 10 तर बंद करण्याची वेळ रात्री 10.30 अशी निश्‍चित करून दिली आहेे. परंतु बेळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी परवानाधारक दारू दुकाने सकाळी 10 वा. सुरू करण्याऐवजी वेळेआधीच उघडली जातात. काही ठिकाणी पहाटे 5 वा. तर काही ठिकाणी सकाळी 7 वा. दारु दुकाने सुरू केलेली दिसून येतात.

बेळगाव शहरातील शहापूर, खासबाग, वडगावसारख्या ठिकाणी असलेली दारू दुकाने वेळेचे बंधन पाळत नाहीत, असेच दिसून येते. या उपनगरीय भागात विणकर, हमाल, सफाई कर्मचारी, मोलमजुरी करणार्‍यांची संख्या मोठी आहे. यामधील अनेकजण पहाटेपासून मद्याचे घोट रिचवून कामाला लागतात.त्यामुळे पहाटे 5 वा. दुकान सुरू केले तरी ग्राहक मिळतात, याची जाणीव असल्यामुळे काही दारू दुकानदार वेळेआधीच दुकाने सुरू करतात. रात्रीच्यावेळीही शहरातील अनेक मद्यविक्री दुकाने आणि बार 10.30 वा. बंद करण्याऐवजी 11.30 ते 12 वा. पर्यंत सुरु असतात.

शहरात वेळेचे बंधन आणि नियम डावलून मद्य विक्री होत असल्याची माहिती अबकारी खात्याबरोबरच स्थानिक पोलिसांनाही असते. मात्र  दुकानदारांबरोबर झालेल्या सेटिंग्जमुळे मद्यविक्रीचा ‘बे’लगाम कारभार राजरोस सुरु आहे.