Thu, Aug 22, 2019 08:27होमपेज › Belgaon › लिंगायत स्वतंत्र धर्माला मान्यता द्या, अन्यथा निवडणुकीत दणका

लिंगायत स्वतंत्र धर्माला मान्यता द्या, अन्यथा निवडणुकीत दणका

Published On: Jun 16 2018 1:28AM | Last Updated: Jun 15 2018 11:32PMबेळगाव : प्रतिनिधी

लिंगायत स्वतंत्र धर्माला केंद्र सरकारने त्वरित मान्यता द्यावी, अन्यथा येत्या लोकसभा निवडणुकीत  भाजपला दणका देवू असा इशारा लिंगायत मठाधिशांनी दिला. त्याचबरोबर स्वतंत्र धर्माच्या मागणीसाठी आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी शिष्टमंडळ नेणार असल्याची माहिती देण्यात आली.शुक्रवारी नांगनूर रुद्राक्षी मठामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन लिंगायत मठाधिशांच्यावतीने करण्यात आले होते. त्यावेळी उपरोक्त माहिती देण्यात आली.

नांगनूर मठाचे डॉ. सिद्धराम स्वामी म्हणाले, आमच्या मागण्या घेऊन मठाधिशांचे शिष्टमंडळ पंतप्रधान मोदी यांना भेटणार आहे. केंद्र सरकारला स्वतंत्र लिंगायत धर्माबाबत निर्णय घेण्यासाठी काही काळाचा अवधी देण्यात येणार आहे. मात्र सध्या राज्य सरकारने पाठविलेला स्वतंत्र लिंगायत धर्माचा प्रस्ताव केंद्राने फेटाळल्याची खोटी माहिती सांगण्यात येत आहे. असा प्रकार घडलेला नाही. राज्याने पाठविलेला प्रस्ताव केंद्राकडे प्रलंबित आहे. मात्र चळवळीला खिळ घालण्यासाठी हिंदुवादी वीरशैव समाजाकडून असा अपप्रचार सुरू असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

केंद्र सरकारने प्रस्ताव फेटाळल्यास आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे. त्याठिकाणी न्यायासाठी दरवाजा ठोठावणार आहोत. मात्र असा प्रकार केंद्र करणार नाही. याची खात्री आम्हाला असल्याचे सांगितले.

लिंगायत स्वतंत्र धर्माला पाठिंबा दिल्याचा फायदा काँग्रेसला झाला आहे. तर भाजपला फटका बसला आहे. लिंगायत धर्माच्या चळवळीत सहभागी झालेल्या एम. बी. पाटील, बसवराज होरट्टी यांना मंत्रिपदापासून वंचित ठेवण्यात आले आहे. सरकारने जिल्हानिहाय मंत्रिपदाची संधी देणे आवश्यक असून स्वतंत्र धर्माची चळवळ येत्या काळात तीव्र करणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी विविध मठाचे मठाधिश पत्रकार परिषदेला उपस्थित होते.