Thu, Apr 25, 2019 21:24होमपेज › Belgaon › जीवन ही लढाईच; लढत रहा

जीवन ही लढाईच; लढत रहा

Published On: Jun 06 2018 1:41AM | Last Updated: Jun 05 2018 11:44PMबेळगाव : प्रतिनिधी

प्रसिद्ध उद्योजक आणि अमृत फार्मास्युटिकल्सचे मालक शैलेश जोशी यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली अन् संपूर्ण बेळगावच नव्हे तर परिसरालाही धक्का बसला. अलिकडे आत्महत्या करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. एखादी व्यक्ती टोकाचा निर्णय का घेते, आत्महत्येची लक्षणे आधी दिसतात का, त्यावर उपाय योजले जाऊ शकतात का, या सर्व प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा केलेला हा प्रयत्न...

आत्महत्येची प्रवृत्ती वाढत आहे. त्यामागे अनेक कारणे आहेत. एकत्र कुटुंबपद्धती लोप पावत चालली आहे. त्यामुळे अचानक किंवा मनाविरूद्ध घडलेल्या घटनेशी, त्या स्थितीशी सामना करण्याची शक्ती कमी होत चालली आहे. नकारात्मक भावना निर्माण होऊन टोकाचा निर्णय घेतला जात आहे. पैशाने सर्व काही मिळते ही वृत्ती वाढत आहे. कोणत्याही गोष्टीसाठी आज धीर धरला जात नाही. ‘आत्ताच्या आत्ता’ ते हवं असतं. मनाविरूद्ध घडलेली घटना सहन करण्याची शक्ती कमी होत चालली आहे. चंगळवाद वाढत आहे. तब्येतीच्या तक्रारीही वाढत आहेत. या सर्व कारणांमुळे तणाव निर्माण होऊन वैफल्य सहन करण्याच्या शक्तीवर परिणाम होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.


आत्महत्या करण्याचा विचार येणे हा मानसिक विकार आहे. ते वेड नव्हे. समुपदेशनाने हा विकार दूर करता येतो. नेहमी सकारात्मक विचार करावा. नकारात्मकतेकडे वळल्यानंतर तो प्रवास भलत्याच ठिकाणी आपल्याला घेऊन जातो. एकमेकांशी नेहमीच संवाद साधणे आवश्यक आहे. एकलकोंडे राहिल्यास आपल्या समस्या इतरांना समजणार नाहीत.’’
- डॉ. सोनाली सरनोबत, अध्यक्षा, नियती फौंडेशन, समुपदेशक

“आत्महत्या करण्याच्या प्रवृत्तीला वैद्यकीय भाषेत ‘इमोशनल हायजॅक’ म्हटले जाते. या अवस्थेत व्यक्तीचा वैचारिक गुंता होतो. त्या व्यक्तीची मन:स्थिती बिघडते. कुटुंबीयांनी वेळीच त्यांची वर्तणूक ओळखून त्यांना मानसोपचार तज्ज्ञाकडे नेणे गरजेचे असते. त्या व्यक्तीला आधार हवा असतो. समुपदेशन यावर उत्तम उपाय ठरू शकतो.’’
- डॉ. रमा मराठे, मानसोपचार तज्ज्ञ

“अनेकदा आत्महत्येची धमकी काहीजण देतात. कुणीही असे बोलत असेल तर घरच्यांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. वेळीच समुपदेशन व्हावे. मानसिक रूग्ण म्हणजे वेडेपणा नव्हे. समाजाने त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा पुढे निश्‍चितपणे धोका असतो.’’
    - डॉ. जी. एस. भोगले, मानसोपचारपज्ज्ञ