Sun, May 19, 2019 13:59
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › ‘विरोधक ही जनावरे’ हीच शहांची मानसिकता

‘विरोधक ही जनावरे’ हीच शहांची मानसिकता

Published On: Apr 08 2018 2:10AM | Last Updated: Apr 08 2018 12:26AMबंगळूर : प्रतिनिधी

राजकीय विरोधक म्हणजे जनावरेच आहेत, असे वक्‍तव्य करून भाजपाध्यक्ष अमित शहांनी आपली मानसिकता दाखवली आहे. त्यांच्या द‍ृष्टीने ते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोघेच या देशात ‘माणूस’आहेत. बाकी सगळी जनावरेच आहेत. या जनावरांमध्ये त्यांना लालकृष्ण अडवाणी आणि नितीन गडकरींसारख्या ज्येष्ठांचाही समावेश केला आहे, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.

काँग्रेस विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या जनाशीर्वाद यात्रेच्या पाचव्या व अंतिम टप्प्यासाठी राहुल कर्नाटकाच्या दौर्‍यावर आहेत. शनिवारी त्यांनी बंगळूरमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केला, तर कोलारमध्ये रोड शो केला.

राहुल म्हणाले, ‘शहांनी विरोधकांना जनावर म्हणणे ही भाजप आणि रा. स्व.संघाचीच मानसिकता आहे. या देशात माणसे दोनच आहेत. बाकी सगळीच जनावरे. दलित, आदिवासी, अल्पसंख्य आणि त्यांच्या स्वतःचे पक्षातले अडवाणी, गडकरी, मुरली मनोहर जोशीही त्यांच्यासाठी जनावरे आहेत. त्यांचे म्हणणे आम्ही योग्यच मानले पाहिजे. कारण त्यांच्याकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा नाही. भाजपच्या इतर नेत्यांनाही शहांची ही वृत्ती माहीत आहे, पण ते जाहीरपणे तसे बोलू शकत नाहीत. म्हणून ते आमच्याशी खासगीत बोलतात.’

मुंबईत शुक्रवारी झालेल्या भाजप स्थापना दिन कार्यक्रमात शहा यांनी विरोधी पक्षांची तुलना जनावरांशी करताना पुरात वटवृक्ष निश्‍चल राहतो, पण साप, मुंगूस, कुत्रे आणि उंदीर आश्रयासाठी धावतात, अशा आशयाचे विधान केले होते. त्यावर चहुबाजूंनी टीका झाल्यानंतर शहांनी आपला उद्देश जनावरे म्हणण्याचा नव्हता, असा दावा केला. 

Tags : Belgaum, Belgaum news, Legislative Assembly election, Congress campaigning, Rahul Gandhi, Karnataka tour,