होमपेज › Belgaon › लवटे,देशपांडे,शिवुरकरांना साहित्य संघाचे पुरस्कार

लवटे,देशपांडे,शिवुरकरांना साहित्य संघाचे पुरस्कार

Published On: Feb 09 2018 1:59AM | Last Updated: Feb 08 2018 8:38PMयेळ्ळूर : वार्ताहर

येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्यावतीने देण्यात येणार्‍या साहित्यिक व सामाजिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या पुरस्काराचे मानकरी डॉ. सुनीलकुमार लवटे (कोल्हापूर), अशोक देशपांडे (बेळगाव), निशा शिवुरकर (अहमदनर) हे आहेत. रविवारी येळ्ळूर येथे होणार्‍या 13 व्या साहित्य संमेलनात हे पुरस्कार प्रदान केले जातील.

राष्ट्रवीरकार शामराव देसाई साहित्यिक पुरस्कार डॉ. सुनीलकुमार लवटे यांना देण्यात येणार असून प्राचार्य अनंतदेसाई यांच्यामार्फत हा पुरस्कार देण्यात येतो. डॉ. लवटे हिंदी, मराठी साहित्याचे अभ्यासक, साहित्यिक आहेत. त्यांचे खाली जमीन वर आकाश हे आत्मचरित्र मराठी, हिंदी, गुजराती भाषेसह ब्रेल लिपीत प्रकाशित झाले आहे.  वि. स. खांडेकर, यशवंतराव चव्हाण आणि मामासाहेब जगदाळे यांच्या स्मृतिसंग्रहालयांची त्यांनी उभारणी केली आहे.

दिवंगत मारुती पाटील (पेंटर) सामाजिक पुरस्काराचे मानकरी बेळगावचे अशोक देशपांडे ठरले आहेत. परशराम पाटील (येळ्ळूर) यांच्यामार्फत हा पुरस्कार देण्यात येतो.  देशपांडे यांनी ग्रामीण विकास, ग्राम स्वच्छता अंधश्रध्दा निर्मूलन, सहकार क्षेत्र, महिला स्वयंरोजगारासाठी भरीव कार्य केले  आहे. कस्तुरबा केंद्र, कडोली, गांधीजी निर्यात सेवा संघ, गांधीजी पीस फाऊंडेशन धारवाड, जीवन विवेक प्रतिष्ठान बेळगाव या संस्थेच्याद्वारे त्यांची समाजसेवा सुरू आहे. 

रमाबाई आंबेडकर महिला सामाजिक पुरस्काराच्या मानकरी संगमनेर (अहमदनगर) येथील सामाजिक कार्यकर्त्या निशा शिवुरकर ठरल्या आहेत. दलित संघटनेचे नेते मल्लेश चौगुले (बेळगाव) यांच्यामार्फत हा पुरस्कार देण्यात येतो.